Sindhudurg News : कोकिसरे रेल्वे भुयारी पुलाचे काम संथगतीने

वाहनचालक, प्रवासी व नागरिक त्रस्त
Sindhudurg News
कोकिसरे रेल्वे भुयारी पुलाचे काम संथगतीने
Published on
Updated on

वैभववाडी : गेली तीन वर्षे सुरू असलेले कोकिसरे येथील रेल्वे भुयारी पुलाचे काम आणि दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भुयारी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्णत्वास आले असले तरी जोडरस्ते आणि संरक्षक भिंतींची कामे रखडल्यामुळे नागरिकांना अजून काही महिने रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी आणि प्रतीक्षेचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटक परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. रेल्वे ये-जा करताना फाटक बराच वेळ बंद राहत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून भुयारी पुल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी करीत होते. अखेर कोकण रेल्वे महामंडळाकडून याठिकाणी भुयारी पुल मंजूर करण्यात आला. फेब्रुवारी २०२३ मध्ये भुयारी पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.

कोकण रेल्वेच्या संपादित जमिनीतून ८५ मीटर लांबीचा, ८.५ मीटर रुंदीचा, दोन लेनचा आणि ५.५ मीटर उंचीचा भुयारी पूल उभारण्यात आला आहे. पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजूंना उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतींचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय पुलाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जोडरस्त्यांची कामेही रखडलेली आहेत. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे.

एका बाजूचा जोडरस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी नारकरवाडी बाजूकडील जोडरस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. भुसंपादन प्रक्रियेत हे काम रखडले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यातही नागरिकांना रेल्वे फाटकावर थांबण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून कोकण रेल्वे प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news