Sindhudurg News : सातोळी-बावळाट ग्रामस्थ महावितरणविरोधात आक्रमक

उपअभियंता कार्यालयाला ठोकले टाळे
Sindhudurg News
सातोळी-बावळाट ग्रामस्थ महावितरणविरोधात आक्रमक
Published on
Updated on

सावंतवाडी : सातोळी-बावळाट गाव गेले सहा दिवस अंधारात आहे. याबाबत महावितरणचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गुरुवारी सावंतवाडी येथील महावितरण उपअभियंता कार्यालयावर धडक देत, कार्यालयालाच टाळे ठोकले. सरपंच सोनाली परब आणि सामाजिक कार्यकर्ते दया परब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

अधिकारी देत होते वेगवेगळी कारणे  

सातोळी-बावळाट गावात गेल्या ६ दिवसांपासून वीज गायब आहे. महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता इन्सुली येथील ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड आहे, तर कधी केसरी - धनगरवाडा परिसरात फॉल्ट आहे, अशी वेगवेगळी कारणे देऊन बोळवण केली जात होती. मात्र, काम कधी पूर्ण होणार, याची स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. वीज नसल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजना बंद पडल्या. मोबाईल चार्जिंग अभावी संपर्क यंत्रणा कोलमडली आणि इंटरनेट बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. फ्रीज बंद पडल्याने अन्नधान्य व औषधे खराब होऊन लोकांचे आर्थिक नुकसान झाले.

याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन हलत नसल्याने गावकऱ्यांचा संयम सुटला. गुरूवारी सकाळी सरपंच सोनाली परब, दया परब आणि ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला आणि थेट कार्यालयाला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना बाहेरच रोखले. यादरम्यान स्थानिक कनिष्ठ अभियंता महंमद बागवान यांचा मोबाईल फोन बंद असल्याने गावकऱ्यांचा संताप आणखी वाढला. अधीक्षक अभियंत्यांनीही सुरुवातीला समाधानकारक उत्तर दिले नाही.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित!

सुमारे तीन तास चाललेल्या या तीव्र आंदोलनानंतर आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी सायंकाळपर्यंत सातोळी -बावळाट गावाचा वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या लेखी हमीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. सायंकाळपर्यंत वीज सुरू झाली नाही, तर शुक्रवारी यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. वीज पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थानी आंदोलन स्थगित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news