

विराज परब
बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली येथील उड्डाणपूल अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, इतक्या कमी कालावधीतच या उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पुलावरील काँक्रीट रस्त्याला तडे जाणे, जॉईंटच्या ठिकाणी पोकळ भाग निर्माण होणे, काँक्रीट उखडून खड्डे पडणे तसेच पुलाच्या संरचनेवर डागडुजी सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच काही वाहनचालकांनी रस्ता समतोल नसल्याची तक्रार केली होती. पुलावरील काही ठिकाणी वाहनांना अचानक धक्के बसत असल्याने दुचाकीस्वारांना विशेष खबरदारी घेत प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली असून, पुलावरील काँक्रीटमध्ये पडलेले तडे आणि उखडलेले भाग स्पष्टपणे दिसून येत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलाचे काम घाईगडबडीत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. पुलाच्या भिंतींवर सेंट्रिंगसाठी वापरण्यात आलेल्या प्लायवूडच्या फळ्यांच्या जोडांमधील गॅप नंतर भरून काढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी काँक्रीटचे पॅच मारून गॅप झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. पुलावरील काँक्रीट रस्त्याच्या जॉईंट ठिकाणी पोकळ भाग तयार झाला आहे. याच भागात काँक्रीट उखडले असून लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्याला लांबीने तडे गेले असून हे तडे दिवसेंदिवस वाढत आहेत. जड वाहतुकीमुळे या भागावर अधिक ताण येणार असल्याने भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत सातत्याने होत असलेल्या तक्रारींनंतर ठेकेदाराकडून उड्डाणपुलावर डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. उखडलेल्या भागात पुन्हा काँक्रीट भरून गॅप बुजविण्याचे काम सुरू असून, पुलाच्या भिंतीवरील काही ठिकाणीही दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच दुरुस्तीची वेळ आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुलाच्या बाजूच्या भिंतींवर अनेक ठिकाणी पॅचवर्क केल्याचे दिसत असून, सेंट्रिंगच्या खुणा आणि भरावाचे कामही स्पष्टपणे नजरेस पडत आहे. त्यामुळे केवळ वरवरची डागडुजी करून समस्या लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संपूर्ण उड्डाणपुलाचे स्वतंत्र तांत्रिक परीक्षण करावे, निकृष्ट काम झालेल्या भागाची नव्याने दुरुस्ती करावी, संपूर्ण रस्ता समतोल करावा आणि दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.