

मळगांव : आजगाव-धाकोरा परिसरात एका खाजगी कंपनीकडून मायनिंगसाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आणि संतप्त नागरिकांनी सोमवारी सायंकाळी सर्व्हे करणाऱ्या सातजणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
खासगी कंपनीकडून मायनिंगसाठी सुरू ड्रोन सर्व्हे वादात सापडला आहे. या सर्व्हेला आपला विरोध असल्याचे सांगून येथील ग्रामस्थांनी हा सर्व्हे हाणून पाडला. तसेच संबंधित सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या ड्रोनचे नुकसान केले आहे. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दम दिला. याबाबत धाकोरे-आजगांव पंचक्रोशील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
मायनिंग संबंधात काम करणाऱ्या एका कंपनीला हा सर्व्हे करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर मिळाले आहेत. त्यानुसार सावंतवाडी- वेंगुर्ला तालुक्यातील तब्बल २१ गावांत हा सर्व्हे केला जाणार असल्याचे काही सरपंचांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासन किंवा ग्रामस्थांना काही माहिती नाही. आपल्याला विचारात न घेता हा सर्व्हे केला जात असल्यामुळे त्यांच्याकडून नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे समजते.
आजगाव - धाकोरातील नागरिकांनी व्यक्त केलेला विरोध हा केवळ मायनिंगविरोधी संघर्ष नाही. तो आपल्या जलस्रोतांच्या, शेतीच्या, जैवविविधतेच्या आणि पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला लढा आहे. एकदा डोंगर पोखरले गेले, जलप्रवाह बदलले आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले की, त्याची किंमत कोणत्याही खनिज संपत्तीपेक्षा अधिक मोजावी लागते. विकासाचा अर्थ निसर्गाचा विनाश आणि स्थानिकांच्या अधिकारांचे दमन असा असू शकत नाही. या घटनेने सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लोकांचा तीव्र विरोध असताना अशा हालचाली होत असतील, तर प्रशासन नेमके कोणाच्या बाजूने उभे आहे? सामान्य नागरिकांच्या की प्रभावशाली हितसंबंधांच्या? ग्रामसभेच्या ठरावाचा आदर होणार की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
सातजणांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे. ड्रोन सर्वेक्षण कोणाच्या सूचनेवर झाले, त्यामागील उद्देश काय होता, आवश्यक परवानग्या होत्या का, स्थानिक प्रशासनाला याची पूर्वकल्पना होती का, या सर्व प्रश्नांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण घडामोडीमागील साखळी उघड झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.