Sindhudurg News : पावसाच्या दडीने भात उत्पादक शेतकरी अडचणीत

कुडाळ तालुक्यात मोटरपंपाच्या मदतीने भातलावणी
Sindhudurg News
पावसाच्या दडीने भात उत्पादक शेतकरी अडचणीत
Published on
Updated on

वालावल : ऐन भातलावणीच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. चेंदवण येथील पडोसवाडीतील शेतकऱ्यांवर तर लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली असून, तयार झालेली भाताची रोपे वाचविण्यासाठी ते विहिरीतील पाणी पंप आणि डिझेल इंजिनच्या साहाय्याने शेतात आणून कशीबशी लावणी पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत.

चेंदवण परिसरातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर विश्वास ठेवून पेरण्या पूर्ण केल्या होत्या. रोपेही लावणीसाठी तयार झाली होती. मात्र, लावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पाणी आटले असून, जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीचा आधार घेतला आहे. विहिरीतून लांब पाईपलाईन टाकून डिझेल इंजिनच्या साहाय्याने पाणी शेतात आणले जात आहे. त्यानंतर चिखल तयार करून भातलावणीची कामे केली जात आहेत. मात्र, ही प्रक्रिया खर्चिक आणि कष्टाची ठरत आहे.

आधीच बियाणे, खते आणि मजुरीवर मोठा खर्च झालेला असताना आता डिझेलसाठी दररोज अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. डिझेलचे वाढते दर आणि पावसाचा लांबलेला खंड यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. "पाऊस नसल्याने पारंपरिक पद्धतीने शेती करणे अशक्य झाले आहे. विहिरीचे पाणी वापरून लावणी करावी लागत आहे; मात्र डिझेलचा वाढता खर्च पाहता ही शेती आम्हाला कशी परवडणार?" असा संतप्त सवाल चेंदवण पडोसवाडीतील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news