

कुडाळ : चोरट्या पद्धतीने दारू विक्री करण्याच्या उद्देशाने गोवा दारू ताब्यात बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी कारवाई करत एका विरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी भिकाजी विष्णू बागवे (५८, रा. माणगाव-बेनवाडी) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माणगाव परिसरात गोवा राज्यातून दारू आणून साठवणूक व वितरण होत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना प्राप्त झाली होती. तसेच वाडोस येथील शेतमांगर परिसरात काही व्यक्तींची वर्दळ असून वाहने रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली जात असल्याची व संबंधितांकडून दहशत निर्माण केली जात असल्याची माहितीही पोलिसांकडे आली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास वाडोस परिसरात तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत पोलीस कर्मचारी संदीप एगडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा केसरकर, योगेश वेंगुर्लेकर, प्रणाली रासम व विष्णू रामदास यांनी सहभाग घेतला.
प्राथमिक तपासणीदरम्यान संबंधित मांगर परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. मात्र दारूचा साठा अन्यत्र लपवून ठेवला असावा असा संशय आल्याने पोलिसांनी आसपासची तपासणी सुरू ठेवली. यावेळी मागाराच्या बाजूच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसून आली. पोलिसांनी चौकशी व तपासणी केली असता त्या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूचे पुठ्ठ्यांचे बॉक्स आढळून आले. पुढील पंचनामा केल्यानंतर आरोपी भिकाजी विष्णू बागवे याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोमन होडका – ४८ बाटल्या – किंमत १२ हजार ४८० रुपये किंगफिशर स्ट्रॉंग प्रीमियम बिअर – ९६ टीन – किंमत २१ हजार १२० रुपये, असा एकूण ३३ हजार ६०० रुपयांचा गोवा दारूचा साठा जप्त करण्यात आला.