

बांदा : परिसरात माकडतापाचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी एक रुग्ण हा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असून दुसरा परप्रांतीय युवक आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, माकडतापाची खात्री करण्यासाठी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. मात्र या तपासणीचा अहवाल येण्यासाठी साधारणतः आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे माकडताप झाला आहे की नाही हे निश्चितपणे समजून घेण्यासाठी बराच वेळ लागतो आणि त्या दरम्यान रुग्णांबाबतची अधिकृत माहिती मिळण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागते. काही वर्षांपूर्वी माकडतापामुळे या भागात अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.
बागायती किंवा जंगल परिसरात काम करताना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच माकडतापापासून बचावासाठी डीएमपी (DMP) तेलाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणालाही ताप किंवा संशयास्पद लक्षणे जाणवल्यास ती अंगावर न काढता तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी केले आहे.