Nitesh Rane : कोकणची तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिरांचा समावेश
Nitesh Rane
Nitesh Rane pudhari photo
Published on
Updated on

कणकवली : रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या जाळ्यानंतर आता महाराष्ट्र राज्य जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाची भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. कोकणातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील प्रमुख तीर्थस्थळे आता जलमार्गांनी जोडली जाणार आहेत. “आंगणेवाडी ते कुणकेश्वर, कुणकेश्वर ते गणपतीपुळे आणि गणपतीपुळे ते पाली अशा प्रसिद्ध श्रद्धास्थानांना ५० ते ३० प्रवासी क्षमतेच्या लहान व वेगवान बोटींच्या माध्यमातून जोडण्याची आमची योजना असून, यासाठी आवश्यक जेटी बांधण्याची तयारी वेगाने सुरू आहे”, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी राज्याला जलवाहतुकीत अग्रेसर बनवण्याचा आपला महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला.

मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‌‘मुंबई वॉटर मेट्रो‌’ची संकल्पना राबवण्यात येत असून, २०२८ पर्यंत याचे ३ ते ४ जलमार्ग प्रत्यक्ष सुरू होतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २१ जलमार्ग अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील रेडिओ क्लब ते नवी मुंबई विमानतळ या जलमार्गाचा समावेश आहे. सध्या या प्रवासासाठी सव्वा तास लागतो, मात्र वॉटर मेट्रोमुळे अवघ्या १६ मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. याशिवाय नरिमन पॉईंट ते जुहू आणि वांद्रे वे वर्सोवा अशा असंख्य मार्गांचा यात समावेश असेल.

गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या पारंपारिक जलमार्गाव्यतिरिक्त आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नागरिकांना अलिबागला जाण्यासाठी आधी रेल्वेने अथवा खाजगी वाहनाने गेटवे ऑफ इंडियाला यावे लागायचे. त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी आम्ही वर्सोवा येथे नवीन जेटी उभारली असून तिचे काम पूर्ण झाले आहे. येथून आता मांडवा आणि अलिबागसाठी जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येत आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

स्वीडन, इटलीप्रमाणे महाराष्ट्रातही जलवाहतुकीचे जाळे

युरोपियन देशांमधील प्रगत जलवाहतूक व्यवस्थेचा दाखला देत मंत्री नितेश राणे म्हणाले, “तुम्ही स्वीडन, रोम, इटली किंवा नॉर्वेला गेल्यास तिथे तुम्हाला जलवाहतुकीचे एक सुसज्ज जाळे दिसते, अगदी त्याच धरतीवर आगामी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्र जलवाहतूक क्षेत्रात देशात अग्रेसर दिसेल. रस्ते, रेल्वे आणि मेट्रोप्रमाणेच जलवाहतूक हा महाराष्ट्रातील जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा एक मुख्य आणि तितकाच वेगवान पर्याय बनेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news