Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, 'पॅच डब्लिंग'चा होणार अभ्यास

konkan railway patch doubling: दोन टप्प्यांच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदा जाहीर
Konkan Railway
Konkan RailwayKonkan Railway Social Media Account
Published on
Updated on

konkan railway Track patch doubling Latest News

सावंतवाडी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वेने कर्नाटक आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये 'पॅच डब्लिंग' (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) करण्याच्या उद्देशाने व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत. या निविदेनुसार, प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विभागांचा अभ्यास केला जाणार आहे.

यात मंगळुरूजवळील ठोकूर ते मूकांबिका रोड बिंदूर या ११२ किलोमीटरच्या अंतराचा आणि गोव्यातील माजोर्डा ते महाराष्ट्रातील वैभववाडी रोड या १५१ किलोमीटरच्या अंतराचा समावेश आहे. एकूण २६३ किलोमीटर लांबीच्या या मार्गांच्या अभ्यासासाठी सुमारे १.३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर आहे. निवडलेल्या कंत्राटदाराला कामाचे आदेश मिळाल्यापासून पुढील तीन महिन्यांच्या आत हा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात जमिनीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि बांधकामासाठी लागणारा अंदाजित खर्च यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, ज्यावर पुढील प्रत्यक्ष कामाची दिशा ठरेल.

कोकण रेल्वे मार्ग हा सध्या प्रामुख्याने एकेरी स्वरूपाचा असल्याने गाड्यांना क्रॉसिंगसाठी अनेकदा थांबावे लागते. यापूर्वी रोहा ते वीर या ४७ किमी अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता प्रस्तावित नवीन 'पॅच डब्लिंग'मुळे रेल्वे हाताळणी क्षमता वाढेल, विलंबाच्या समस्या कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीचा ताण पाहता हे पाऊल कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news