Konkan Railway : पावसाळ्यात सुरक्षित रेल्वे सेवेसाठी व्यापक कृती आराखडा!

६५७ कर्मचाऱ्यांची २४ तास गस्त; संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज
Konkan Railway
Konkan Railway pudhari photo
Published on
Updated on

कुडाळ : मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर व्यापक व बहुआयामी मान्सूनपूर्व तयारी केली आहे. संवेदनशील ठिकाणी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्तीसाठी तैनात केले जाणार आहेत.

सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाचा भाग म्हणून, कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, रिअल-टाइम निरीक्षण प्रणाली, वाढीव गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक मान्सून तयारी योजना राबविली आहे. भू-सुरक्षा आणि निरीक्षण तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कोकण रेल्वे मान्सून हंगामातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू राहील. सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मार्गावरील विविध विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येणार असल्याची माहीती कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

मान्सूनसाठी प्रमुख तयारी

पायाभूत सुविधा आणि जलनिस्सारण व्यवस्था करण्यात आली आहे. उतारांची स्थिरता वाढविण्यासाठी निवडक ठिकाणी कटिंग स्लोप्स सपाट करणे आणि सॉइल नेलिंगची कामे करण्यात आली आहेत. बोगदे आणि कटिंग भागांमध्ये रॉक बोल्टिंग व शॉटक्रीटिंगची कामे करून भूगर्भीय संरचना मजबूत करण्यात आल्या असून दरडी कोसळण्याला प्रतिबंध कमी करण्यात आला आहे. गॅबियन भिंती, रिटेनिंग वॉल्स, मायक्रोपाइल्स आणि बोल्डर नेटिंग यांसारख्या संरक्षणात्मक संरचना उभारून भू-तांत्रिक जोखमींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. साइड ड्रेन्स आणि कॅचवॉटर ड्रेन्सची साफसफाई व काँक्रीट लायनिंग पूर्ण करण्यात आली असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होईल याची काळजी घेण्यात आली आहे. सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या भू-सुरक्षा कामांमुळे संपूर्ण मार्गावरील दगड कोसळणे आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. संवेदनशील ठिकाणी पोर्टेबल डीवॉटरिंग पंप तैनात करण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील दशकात मान्सून काळात दगड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मान्सून गस्त आणि देखरेख!

संवेदनशील ठिकाणी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्तीसाठी तैनात केले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा येथे BRN वॅगनवर बसविलेले उत्खनन यंत्र (एक्स्कॅव्हेटर) सज्ज ठेवण्यात आले आहेत. रेल्वे मेंटेनन्स वाहने (Rail Maintenance Vehicles ) (RMVs) वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकल आणि उडुपी या ९ महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स तत्पर ठेवण्यात आल्या आहेत.

अपघात निवारण रेल्वे (Accident Relief Train) (ART) वेरणा येथे तैनात असून १५ मिनिटांत रवाना होण्यासाठी सज्ज आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक संस्थांमार्फत JCB, पोकलेन आणि डंपर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. तातडीच्या प्रतिसादासाठी बॅलेस्टने भरलेल्या रेल्वेगाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सुधारित संपर्क व्यवस्था

सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष व स्थानकांशी संपर्कासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर्सना वॉकी-टॉकी देण्यात आले असून सर्व स्थानकांवर २५-वॅट VHF संच उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी मार्गावर प्रत्येक १ किमी अंतरावर आणि २ किमीपेक्षा जास्त लांबीच्या बोगद्यांमध्ये प्रत्येक ४०० मीटरवर आपत्कालीन संप्रेषण सॉकेट्स (EMC) बसविण्यात आले आहेत. ART आणि ARMV मध्ये सॅटेलाइट फोनची सुविधा आहे.

तंत्रज्ञानाधारित निरीक्षण

माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकल आणि उडुपी येथे स्वयं-नोंदणी करणारे पर्जन्यमापक (Self-recording rain gauges ) कार्यरत आहेत. घोड नदी (इंदापूर–माणगाव), काळ नदी (माणगाव–गोरेगाव), सावित्री नदी (वीर–सापे वामणे) आणि वशिष्ठी नदी (चिपळूण–कामथे) येथील महत्त्वाच्या पुलांवर पूर सूचना प्रणाली कार्यरत असून धोकादायक पाणीपातळीची सूचना अधिकाऱ्यांना दिली जाते. पानवल व्हायाडक्ट (रत्नागिरी – निवसर), मांडवी पूल (थिविम – करमळी) , झुआरी पूल (करमळी – वेरणा) आणि शरावती पूल (होन्नावर – मंकी) येथे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲ नेमोमीटर बसविण्यात आले आहेत.

चोवीस तास नियंत्रण व वैद्यकीय मदत

मान्सून काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असतील. सर्व ७२ स्थानकांवरील CCTV प्रणालींचे निरीक्षण स्टेशन मास्टर कार्यालये आणि मार्गावरील९ RPF चौक्यांमधून केले जाते. कोकण रेल्वे भारतीय हवामान विभाग (IMD) यांच्याशी समन्वय साधून दररोज हवामानाचा आढावा घेते आणि हवामान अंदाजानुसार संबंधित अधिकाऱ्यांना SMS सूचना पाठवते. चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांच्या पॅन्ट्री कारमध्ये अत्यावश्यक औषधांनी युक्त प्रथमोपचार पेट्या उपलब्ध आहेत.

प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा

प्रवासी www.konkanrailway. com या संकेतस्थळावर किंवा 139 या हेल्पलाईन क्रमांकावर रेल्वेची अद्ययावत माहिती मिळवू शकतात. कोकण रेल्वे सुरक्षितता, विश्वासार्ह सेवा आणि प्रवासी सुविधा यांसाठी कटिबद्ध आहे. व्यापक तयारी आणि सतत देखरेखीच्या माध्यमातून कोकण रेल्वे संपूर्ण मान्सून हंगामात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news