

कणकवली : उन्हाळी सुट्टीनिमित्त सिंधुदुर्गच्या गावागावांत आलेले चाकरमानी आता मुंबईला मोठ्या संख्येने परतू लागले आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामुळे सिंधुदुर्गातील सर्वच रेल्वे स्टेशन गजबजुन गेली आहेत. कोकण रेल्वेकडून नियमित गाड्यांसोबतच हॉलिडे स्पेशल गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षे मोठ्या संख्येने मुंबईहून चाकरमानी सिंधुदुर्गच्या गावागावांत दाखल झाले होते. शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी पडल्यानंतर कुटुंब कबिल्यासह चाकरमानी गावी आल्याने एरवी गावातील बंद घरे जागी झाली होती. दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची धावपळ त्यातच उन्हाळी सुट्टीचा संपलेला कालावधी यामुळेे मोठ्या संख्येने मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. चाकरमान्यांसाठी सध्या कोकण रेल्वेचा प्रवास सोयीस्कर असल्याने व त्यातच रेल्वेकडून हॉलिडे स्पेशल गाड्यांची व्यवस्था केल्याने रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत.