

गणेश जेठे
उभं आयुष्य वेचलं तरी देखील स्वतःच्या घराचं स्वप्न अनेकांच्या जीवनात स्वप्नच राहतं. परंतु कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री आणि त्यांचे सहकारी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी व कर्मचारी अधिकाऱ्यानी मेहनत घेऊन कलमठ गावच्या नदीकिनारी सुंदर घरे उभारून एक स्वप्नांची वस्ती साकारली आहे. अनेकांनी पाहिलेलं घरांचे स्वप्न खरेच सत्यात उतरलं आहे.
कलमठ ग्रामपंचायत म्हटली की विविध उपक्रम राबवणारी एक ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सुंदर शाळा अभियान असो, समृद्ध पंचायतराज अभियान असो, प्लास्टिक मुक्ती असो की विधवा प्रथा बंदी असो, की शाळकरी मुलांच्या दाखल्यांची मोहीम असो, जनकल्याणाच्या प्रत्येक योजनेत आणि उपक्रमात हिरिरीने भाग घेणारी ही ग्रामपंचायत. अर्थात त्या ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांची समाजाप्रति असलेली तळमळ आणि आपली सरपंच म्हणूनच असलेली जबाबदारी समर्पित भावनेने ते पार पाडत आहेत. गावातील लोक आणि ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी, अधिकारी त्यांच्या या समर्पित भावनेला साथ देतात. ही आणखी एक जमेची बाजू आहे.
एक किलो प्लास्टिक द्या दोन किलो साखर घ्या, विधवा प्रथा न पाळणाऱ्या कुटुंबाला घरपट्टी माफ असे उपक्रम राबवून इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे सरपंच संदीप मेस्त्री यांनी गावातील भूमिहिनांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मिशन सुरू केले.
कणकवली पोलिस स्थानक हे तसे कलमठच्या हद्दीवर येते. याच पोलिस स्थानकाच्या समोर एक आडवी चाळ आहे.या चाळीत अनेक पारंपरिक व्यावसायिक वर्षानुवर्ष राहतात. त्यांना स्वतःची जमीन नव्हती. त्यामुळे घर बांधण्याचा प्रश्नच नव्हता. आर्थिक परिस्थिती ही घर विकत घेण्याची नसल्यामुळे घरांचे स्वप्न हे स्वप्नच होतं.गावात असे आणखी काही लोक होते त्यांची स्वतःची जमीन नव्हती आणि ते भाड्याने राहत होते अशा सगळ्यांची एकदा ग्रामपंचायतीमध्ये मीटिंग बोलावली गेली आणि त्यांच्यासाठी जमीन उपलब्ध करून त्यांना घर बांधून देण्याची मोहीम सुरू झाली. ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर आणि कर्मचारी खुशाल कोरगावकर व इतरांनी कंबर कसून काम सुरू केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही अशी योजना आहे की या योजनेतून भूमीहिनाना जमीन खरेदीसाठी पैसे मिळतात. असे भूमीहीन निश्चित करण्यात आले. १४ भूमीहीन निश्चित झाल्यानंतर त्यांचे प्रस्ताव जमीन खरेदीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले. रेडी रेकनरच्या दराच्या ५० टक्के रक्कम या योजनेतून भूमीहीनांना मिळते. कलमठचा रेडी रेकनर दर हा प्रति गुंठा एक लाख ६०००० च्या आसपास आहे. ७७ हजार रुपये प्रति गुंठा इतकी रक्कम या भूमीहिनांना सरकाऱी योजनेतून मिळाली.
कलमठ गावातून जानवली नदी वाहते. याच नदी किनारी पत्रकार भगवान लोके यांच्या मालकीची काही जमीन होती. ही जमीन जनहित लक्षात घेऊन लोके यांनी अतिशय कमी दरात ग्रामपंचायतीला देऊ केली. जमिनीचा प्रश्न सुटल्यावर मग घरकुलांची उभारणीचा प्रयत्न सुरू झाला. प्रधानमंत्री घरकूल योजनेतून अखेर १४ घरकुलांना मंजुरी मिळाली.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात कामाचा शुभारंभ झाला.कलमठ गावचे बांधकाम व्यवसायिक सचिन पोळ यांना ही जबाबदारी देण्यात आली. घरकुल योजनेतून २८७ स्क्वेअर फुट इतक्या क्षेत्राचे घर बांधण्यास मदत मिळते.परंतु इथे ३५० स्क्वेअर फुटची घरे बांधण्यात आली. घरकूल योजनेला योजनेतून किचन रूम आणि हॉल बांधता येतो. परंतु या स्वप्नांच्या वस्तीमध्ये किचन रूम, हॉल आणि बेडरूम अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नदीकिनारी वसलेले हे संकुल खूपच देखणे आहे.घरे अतिशय सुंदर आणि सुबक आहेत. काही बेघर असलेल्या कुटुंबीयांनी मेहनत करून जमवलेली काही रक्कम अधिकची म्हणून खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यासाठी चक्क पत्राच्या छपरा ऐवजी स्लॅब घालण्यात आला आहे. त्यामुळे ही घरे आणखी मजबूत आणि आकर्षक दिसत आहेत.
आता या घरांच्या मागच्या बाजूला जाणवली नदी वाहते. या घरांना धोका होऊ नये म्हणून तिथे संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सरपंच मेस्त्री यांना दिले आहे. जिथे ही घरे उभारले आहेत त्या घरांच्या समोर कंपाउंड वॉल आणि पेवर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. त्याशिवाय संपूर्ण परिसरामध्ये स्ट्रीट लाईट उभारण्यात येणार आहे. कलमठ खालची कुंभारवाडी या परिसरात ही वस्ती उभी राहिली असून ती वस्ती आकर्षक, सुरक्षित आणि मजबूत असणार आहे. गेली अनेक वर्ष हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या भूमीहीनाना हक्काची घरे आता मिळणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच या घरांच्या चाव्या बेघर असलेल्या ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे.
सरपंच संदीप मेस्त्री सांगतात की, भूमिहीन दाखले घेण्यासाठी पहिल्यांदा आम्ही शिबिर आयोजित केले. १४ ग्रामस्थ भूमीहीन असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यासाठी एकाच ठिकाणी जागा खरेदी करून घरकुले बांधण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतर कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश काटकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जमिनीच्या हस्तांतरणासाठी मदत केली आणि बघता बघता ही वस्ती उभी राहिली.कोकणात अशी ही एकमेव वस्ती असल्याचा आनंद संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे.