

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या पोटातील आजारांचे अचूक निदान करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली 'इंडोस्कोपी' मशीन वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, खासगी रुग्णालयात इंडोस्कोपी तपासणी करण्यासाठी तब्बल ५,००० रुपयांपर्यंतचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे 'जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान'चे अध्यक्ष राजू (राजेंद्र प्रभाकर) मसुरकर यांनी लक्ष वेधले आहे.
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयाने जिल्हा रुग्णालय सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांना ही मशीन दुरुस्त करण्याबाबत यापूर्वीच लेखी पत्र दिले होते. मात्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मशीनच्या दुरुस्तीचे काम 'अनुअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट' (AMC) कंपनीमार्फत करणे आवश्यक असते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडून या तांत्रिक प्रक्रियेत दिरंगाई झाल्यानेच ही मशीन प्रदीर्घ काळ नादुरुस्त राहते आणि रुग्णांवर खाजगीत जाण्याची वेळ येते, अशी माहिती समोर आली आहे.
महात्मा फुले योजनेच्या निधीतून दुरुस्ती करण्याची मागणी
गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसू नये यासाठी, सावंतवाडी रुग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जमा असलेल्या उपलब्ध निधीतूनच या इंडोस्कोपी मशीनच्या दुरुस्तीचा खर्च तातडीने करण्यात यावा, जेणेकरून मशीन विनाविलंब सुरू होईल, अशी सूचना राजू मसुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नवीन मशीनसाठी जिल्हा नियोजन किंवा CSR निधीचा पर्याय
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या मशीनवर अवलंबून न राहता सावंतवाडी रुग्णालयाकडे एक अतिरिक्त (नवीन) इंडोस्कोपी मशीन असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाकडे त्वरित नवीन मशीनची मागणी करावी. ही नवीन यंत्रसामग्री 'जिल्हा नियोजन समिती' (DPDC) किंवा 'सी.एस.आर.' (CSR) निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावी, असे लेखी पत्र जिल्हा रुग्णालयाला पाठवावे, अशी आग्रही मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे.