Sindhudurg News : कणकवलीत स्‍वयंभू नमो उद्यानचे उद्या भूमिपूजन

मुलभूत सुविधांबरोबरच शहराचा शाश्वत विकास करणार : संदेश पारकर
Sindhudurg News
कणकवलीत स्‍वयंभू नमो उद्यानचे उद्या भूमिपूजन
Published on
Updated on

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्‍यावतीने राज्‍य सरकारच्‍या वैशिष्ट्य पूर्ण अनुदानातून कणकवलीत एक कोटी खर्च करून नमो उद्यान उभारले जाणार आहे. निमेवाडी, सुतारवाडीसह नजीकच्‍या वाड्याना या उद्यानाचा लाभ होणार आहे. सुमारे साडेआठ गुंठे क्षेत्रात साकारल्‍या जाणाऱ्या या उद्यानाचे नामकरण स्‍वयंभू नमो उद्यान असे करण्यात आले आहे. त्‍याचे भूमिपूजन सोमवार १५ जून रोजी स. ११ वा. केले जाणार असल्‍याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. कणकवली शहरात मुलभूत सुविधांबरोबरच शहराचा शाश्वत विकास आम्‍ही करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर,संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, नगरसेविका जाई मुरकर, दिपीका जाधव यांच्‍यासह प्रसाद अंधारी, तेजस राणे आदी उपस्‍थित होते. संदेश पारकर म्‍हणाले, स्‍वयंभू नमो उद्यानात खुली व्‍यायाम शाळा, मुलांचे खेळाचे साहित्‍य, व्‍यासपीठ, योगासाठी बैठक व्‍यवस्‍था, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक केला जाणार आहे. शहराच्‍या ग्रामीण भागाच्‍या विकासाची सुरुवात यामुळे होणार असून या उद्यानामुळे स्‍वयंभू निमेवाडी, सुतारवाडी, बांधकरवाडीचा काही भाग, भटवाडी, फौजदारवाडी, या वाड्यांना लाभ होणार आहे. उद्यानाच्‍या भूमीपूजन कार्यक्रमाला ज्‍यांनी ज्‍यांनी शहर विकास आघाडीच्‍या माध्यमातून आम्‍हाला मदत केली त्‍या सर्व नेत्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शहरवासीयांनी देखील मोठ्या संख्येने उपस्‍थित राहावे असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

ते म्‍हणाले, केंद्रशासन, राज्‍यशासन, डीपीडीसी आणि न.पं.च्‍या फंडातून शहरात पुढील काळात अनेक विकास कामे होणार आहेत. शहरात प्रतिमाणसी १३५ लीटर पाणी देणारी पूरक नळ योजना होणार आहे. त्‍याचबरोबर भुयारी गटार योजना, रस्‍ते काँक्रीटीकरण, नाट्यगृह, भव्‍य प्रसाधनगृह अशी कामे होणार आहेत. २०० ते २५० गुंठे जागेत क्रीडांगण साकारले जाणार असून भूसंपादनासाठी चार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्‍याशिवाय न.पं. चे अग्‍निशमन केंद्र उभारले जाणार आहे, त्‍यासाठी निधीचा प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे. शहरामध्ये दोन भाजी मार्केट होणार असून जून्‍या भाजी मार्केटमध्ये भव्‍य व्‍यापारी संकुल उभारले जाणार आहे. तर आरक्षित जागेतील भाजी मार्केट नियमांची पुर्तता करुन ते काम मार्गी लावले जाणार आहे. तसेच श्रीधर नाईक ते मंजूनाथ हॉटेल पर्यंत उड्डाणपुलाखाली सुशोभी करणाचा स्‍मार्टसिटी प्रकल्‍प राबवला जाणार आहे. त्‍यासाठी आवश्यक परवानग्या घेऊन निधी उपलब्धतेनुसार हे काम होणार आहे. गेल्‍या सहा महिन्‍यात न.प.कडून अनेक कामे प्रस्‍तावित करण्यात आली असून लवकरच त्‍याची घोषणा केली जाईल असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

ते म्‍हणाले आम्‍ही सर्वजण जागरुक लोकप्रतिनीधी आहोत. शहरवासीयांना जास्‍तीत जास्‍त चांगल्‍या सुविधा मिळाव्‍यात यासाठी जास्‍तीत जास्‍त निधी आणण्याचा आमचा प्रयत्‍न आहे. शहरामध्ये 5 प्रकारची अतिक्रमणे आहेत. त्‍यात उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे, गडनदी ते जानवली पूलदरम्‍यान आरओडब्‍ल्‍यू मधील अतिक्रमणे, खाजगी जमिनीतील अतिक्रमणे आहेत. फळ, फुल, भाजी विक्रेत्‍यांना तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात पुलाखालील जागा देणार आहोत. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवणार असल्‍याचे संदेश पारकर यांनी सांगितले. कालच्‍या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्‍यान अनेक गैरप्रकार आणि स्‍टॉल कोणाचे होते हे उघड झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news