

वैभववाडी : भुईबावडा कॉपी प्रकरणातील संशयित आरोपी संजय कणिराम राठोड (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय उंबर्डे) याला वैभववाडी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक करून गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणी राठोड व हेत हायस्कूलचे शिक्षक संजय कुमार आडे व एका अज्ञात व्यक्तीविरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहावी परीक्षेदरम्यान आपल्या मुलाला जास्त गुण मिळावे या हव्यासापोटी मुख्याध्यापक असलेला राठोड आणि रिलिव्हर पर्यवेक्षक आडे हे परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीच्या हस्ताक्षरातील उत्तरे लिहिलेल्या पुरवण्या वर्गातील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या उत्तरपत्रिकेस जोडण्यात सांगत असत, असा आरोप विभागीय मंडळाच्या चौकशीत ठेवण्यात आला होता.
वैभववाडी गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी २२ जून रोजी फिर्याद दिली होती. त्यानंतर गेले २३-२४ दिवस वैभववाडी पोलिस आडे व राठोड यांच्या मागावर होते. हे दोन्ही शिक्षक नॉट रिचेबल होते. ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान, संजय राठोड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्ह्याची गंभीरता व व्याप्ती विचारात घेता जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. अर्ज फेटाळल्यानंतर बुधवारी संजय राठोड हा स्वतःहून वैभववाडी पोलिस ठाण्यात हजर झाला. वैभववाडी पोलिसांनी त्याला गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले. वैभववाडी पोलिसांनी या गुन्ह्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे न्यायालायाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील दुसरा आरोपी संजयकुमार आडे यानेही अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो त्याने मागे घेतल्याचे समजते. आता राठोडप्रमाणे तोही स्वतः पोलिस ठाण्यात हजर होतो की पोलिसांना त्याला शोधून काढावे लागणार हे पाहावे लागणार आहे. तिसरा आरोपी हा अज्ञात असून या दोघांच्या चौकशीत तो उत्तरपत्रिका लिहिणारा तिसरा आरोपी कोण हे उघड होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत..
२१ जणांवरील कारवाईचे काय?
या प्रकरणातील त्या २१ जणांवर कोकण विभागीय बोर्डाने संबंधित शिक्षण संस्थाना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या संस्थांनी त्या दोषींवर काय कारवाई केली, अशी विचारणा केली जात आहे.