SSC Copy Case : भुईबावडा कॉपी प्रकरणाचा सूत्रधार मुख्याध्यापक संजय राठोड

मुलाला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास : एकूण २४ जणांवर कारवाईचे आदेश
Copy
CopyPudhari
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहावी परीक्षेतील कॉपी प्रकरणाचा सूत्रधार हा उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय राठोड हेच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून त्यांच्यासह आणखी २३ जणांवर कारवाई करण्याचे आदेश कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. एकूण २४ जणांपैकी संजय राठोड, रिलीवर पर्यवेक्षक संजय कुमार आडे आणि एक अन्य अज्ञात व्यक्ती अशा तीन जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या कारवाईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून कारवाईबाबत विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण प्रेमींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळावेत या लालसेपोटी पालकाने घडवून आणलेला गैरप्रकार तब्बल २४ जणांच्या करिअरला ग्रहण लावणारा ठरला आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील 'आदर्श विद्यामंदिर' केंद्रावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात, एका विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील यंत्रणेचाच गैरवापर करण्यात आला. या प्रकरणी कोंकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.

एकाच विद्यार्थ्यासाठी संपूर्ण यंत्रणा वेठीस !

चौकशीअंती एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे. या केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार घडलेला नाही. मात्र, एकाच विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या पाच विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार करण्यासाठी केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक आणि स्टेशनरी सुपरवायझर अशा सर्वांनाच या गैरप्रकारात ओढण्यात आले. आपल्या पाल्याला अधिक गुण मिळवून देण्याच्या हव्यासामुळे पालकाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान तर केलेच, पण सोबतच इतर शिक्षकांनाही अडचणीत आणले. एकाच विद्यार्थ्याच्या प्रकरणात २४ जणांवर कारवाई प्रस्तावित होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.

मुख्य सूत्रधार आणि गुन्हेगारी कारवाई

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हे संबंधित विद्यार्थ्याचे पालक संजय कणिराम राठोड आहेत, जे स्वतः मुख्याध्यापक आहेत. त्यांच्यासोबतच शिक्षक संजय कुमार खेमा आडे यांचा या प्रकरणात तितकाच मोठा सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या दोघांसह उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहिणारी अज्ञात व्यक्ती अशा तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंकण विभागीय मंडळाने दिले आहेत. यासाठी सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा कालावधीत पेपर दिवशी संबंधित विद्यार्थ्यांचे पालक श्री. राठोड आणि रिलीव्हर पर्यवेक्षक श्री. आडे हे परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीच्या हस्ताक्षरातील उत्तरे लिहिलेल्या पुरवण्या वर्गावरील पर्यवेक्षकांकडे देऊन त्या मुख्य उत्तरपत्रिकेस जोडण्यास सांगत असत. त्यास काही पर्यवेक्षकांनी विरोधही केला. मात्र मूल्यमापन प्रक्रियेत असलेल्या दोन विषयांच्या परीक्षक व नियमकांनी मंडळास मुख्य उत्तरपत्रिका व पुरवण्यांवरील उत्तरे यातील हस्ताक्षरात तफावत असल्याबाबत अहवाल पाठवला. या अहवालामुळे हे प्रकरण उघडकिस आले. मात्र इतर विषयांच्या परीक्षकांनी ही बाब दुर्लक्षित केली. विशेष म्हणजे वर्गात परीक्षार्थी याने काही प्रश्नांची उत्तरे स्वतः मुख्य उत्तरपत्रिकेत लिहिली तरीही अज्ञात व्यक्तीकडून बाहेरून लिहून आणलेल्या पुरवण्यांमध्येही वेगळ्या हस्तक्षरात त्याच प्रश्नांसह इतर प्रश्नांची उत्तरे आढळून आली.

या प्रकरणात विभागीय मंडळात २७ एप्रिल २०२६ रोजी संबंधितांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्या आधारे मंडळांनी परीक्षार्थीच्या पाच विषयाची संपादनूक रद्द केली. केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकार घडला आहे किंवा कसे? तसेच यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे, यासाठी मंडळाने चौकशी अधिकारी तसेच माध्य. शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना केंद्रावर भेट देऊन चौकशी करण्यास निर्देश दिले. त्यानुसार चौकशी अधिकारी यांनी २२ मे रोजी परीक्षा केंद्रास भेट देऊन चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news