Sindhudurg News : आंबोलीत ८ शिकारी जेरबंद

आलिशान कारसह बंदुका, बॅटरी, तलवारी, काडतुसे जप्त
Sindhudurg News
आंबोली : १) ताब्यात घेतलेल्या संशयित शिकाऱ्यांसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी. २) जप्त केलेले मृत वन्यप्राणी, बंदुक, काडतूस, तलवार आदी.
Published on
Updated on

आंबोली : वन्यजीवांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांवर आंबोली वन विभागकडून चौकुळ म्हराटी बेरडकी आणि शिरगावकर पॉईंट येथे दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यातील एका कारवाईत कोल्हापूर येथील ६ व स्थानिक १, तर दुसऱ्या कारवाईत १ स्थानिक असे मिळून ८ शिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तर दोघे जण पळून गेले. या दोन्ही कारवाईत बंदुका, बॅटऱ्या, काडतुसासह तलवार आणि कोल्हापूर पासिंगची आलिशान हेक्टर कार, शिकार केलेली पिसई आणि कटिंदर असे दोन मृत प्राणी जप्त करण्यात आले.

आंबोली वन विभागाचे गस्ती पथक गुरुवारी नेहमीची गस्त घालत असताना साळिंदर प्राण्याची शिकार करून घेऊन जाताना विठू वाघू कोकरे (४५, रा. चरणीचीमुस-चौकुळ) हा दिसून आला. पथकातील वन कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच, गावठी ठासणीची बंदूक, मृत साळिंदर, हेड टॉर्च आणि दारूगोळा असा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या कारवाईनंतर वन विभागाचे गस्ती पथक माघारी आंबोलीला येत असताना शिरगावकर पॉईंट येथे संशयास्पद फिरणाऱ्या तरुणांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक काडतूस बंदूक, ७ जिवंत काडतुसे, १० वापरलेली काडतुसे, दोन टॉर्च, तलवार आणि शिकार केलेले मृत पिसई व कटिंदर आढळून आले. पथकाने पवन प्रकाश देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड), जावेद सलीम जमादार (रा. यादवनगर-कोल्हापूर), हसीम हुसेन काजी (रा. तिरवडे कडगाव, ता. भुदरगड), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, ता. सावंतवाडी), वनु विठ्ठल फोंडे (रा. एरंडपे ता. भुदरगड), गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड-पुणे), आकाश मोहन कुरणे (रा. यादवनगर-कोल्हापूर) आदींना ताब्यात घेतले तसेच शिकारीसाठी वापरलेली हेक्टर कार (एमएच ०९ जीएफ ००१४) असा मुद्देमाल जप्त केला.

या दोन्ही कारवाई सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या नेतृत्वाखाली आंबोली वनक्षेत्रपाल वैभव भिसे, वनपाल नामदेव चौगुले, म्हैबुब नायकवडे, सम्राट पाटील, पो.ह. गोरेश राणे, वनरक्षक रवींद्र पाटील, संग्राम पाटील, बदाम राठोड, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख, आरआरटी टीमचे प्रथमेश गावडे, दीपक नाटलेकर, शुभम कळसुलकर यांनी केले.

नागरिकांनी किंवा पर्यटकांनी परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे. या सर्व संशयितांना न्यायालयाने २० जूनपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news