Sindhudurg Tourism : ‘सिंधुदुर्गच्या ॲमेझॉनला’ तत्त्वतः मंजुरी

तिलारी खोऱ्यात साकारणार राष्ट्रीय उद्यान; वनमंत्री गणेश नाईक यांचे सकारात्मक संकेत
Sindhudurg Tourism
Sindhudurg Tourism
Published on
Updated on

ओम देसाई

दोडामार्ग : 'सिंधुदुर्गचे ॲमेझॉन' अशी ओळख मिळालेल्या तिलारी खोऱ्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळावा, अशी मागणी विधानमंडळात होताच राज्य शासनाने त्याची दखल घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी तिलारी परिसरात राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देत सकारात्मक संकेत दिल्याने दोडामार्ग तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे.

जैवविविधतेने समृद्ध, नैसर्गिकरीत्या जंगली हत्तींचे वास्तव्य असलेला आणि पश्चिम घाटातील अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय पट्टा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर राष्ट्रीय उद्यानात रूपांतरित झाल्यास केवळ वन्यजीव संवर्धनालाच चालना मिळणार नाही, तर रोजगार, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तिलारी खोरे हे पश्चिम घाटातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या प्रदेशांपैकी एक मानले जाते. दाट सदाहरित जंगल, दुर्मीळ वनस्पती, विविध पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांबरोबरच नैसर्गिकरीत्या वास्तव्य करणारे जंगली हत्ती हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच या भागाला 'सिंधुदुर्गचे ॲमेझॉन' अशी उपमा दिली गेली.

विकासाची नवी संधी

राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने तिलारीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळू शकते. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि पर्यावरण अभ्यासासाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. त्यामुळे पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था विकसित होण्याची मोठी संधी उपलब्ध होईल.

गोव्याच्या जवळीकतेचा ठरणार फायदा

तिलारी परिसरापासून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यंत कमी अंतरावर आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या लाखो देशी-विदेशी पर्यटकांसाठी तिलारी सहज उपलब्ध पर्यटनस्थळ ठरू शकते. समुद्रकिनाऱ्यांसोबत जंगल पर्यटनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होईल. परिणामी हॉटेल, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news