Nitesh Rane| पर्यटन आणि रोजगाराची नवीन दालने खुली होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Nitesh Rane
Nitesh Rane
Published on: 
Updated on: 

कणकवलीः सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होणार असल्‍याची माहिती जिल्‍हावासीयांना देताना पालकमंत्री म्‍हणाले, गेल्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे प्रकल्प आणण्यात आले असून, वेंगुर्ला वेळाघर तसेच देवगड येथे प्रस्तावित ताज हॉटेल प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळणार आहे. राज्यासह देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गात येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, पर्यटकांना जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी विमानतळ हे महत्त्वाचे साधन आहे. ताज सारखे हॉटेल्स व विमानसेवा सुरू होणे ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगाराची नवीन दालने खुली होणार असल्‍याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्‍त केला.

ते पुढे म्‍हणाले, या प्रक्रियेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे प्रमुख दीपक कपूर, अपर मुख्य सचिव संजय सेठी, रवींद्र कटकधोंड यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग विमानतळासाठी निर्णय घेण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आभार मानले. विमानतळ सुरू होणे म्हणजे केवळ विमानसेवा सुरू होणे नव्हे, तर पर्यटनाच्या माध्यमातून टूर गाईडपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांना आर्थिक सक्षम होण्याची संधी उपलब्ध होणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी पर्यटन व्यवसायाच्या संधी ओळखून रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.

१६ नोव्हेंबरला केवळ विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने नवी भरारी मिळणार आहे. चला, आपण सर्वांनी मिळून रोजगाराच्या नव्या संधींसाठी सहभागी होऊया आणि विकसित सिंधुदुर्ग घडविण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.