

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे रविवार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव आणि रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त गेले पाच दिवस मंदिरात विविध कार्यक्रम झाले. उत्सव कालावधीत दररोज रात्री होणारा श्रींचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. उत्सवानिमित्त मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. दररोज श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून रविवारी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यानिमित्त मंदिर व परिसर विद्युत रोषणाईसह विविध प्रकाराच्या दुकानांनी सजला आहे.
या मंदिरात बुधवारपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री कलेश्वर महाराजांची श्री मंगेश स्वरूपी दर्शन महापूजा बांधण्यात आली. दुसऱ्या दिवशी श्री पुष्पपूजा, तिसऱ्या दिवशी 51 किलो तांदळाची महापूजा तर चौथ्या दिवशी शनिवारी श्री कलेश्वर महाराजांची सकल ऐश्वर्यसंपन्न शिवपंचायतन दर्शन महापूजा बांधण्यात आली. रविवारी उत्सवमूर्तींची पंचमुखी दर्शन महापूजा बांधण्यात येणार आहे.
गेल्या चार दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोग सादर झाले. शनिवारी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, वरदशंकर पूजा, सायंकाळी दशावतार नाटक ‘गोमय गणेश’, रात्री पुराणवाचन व पालखीतून श्रींची मिरवणूक, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. चारही दिवस रात्री पुराण - पालखीतून श्रींची मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. या जत्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थ, विविध वस्तू, हॉटेल्स, खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.