

कणकवली ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे युतीसंदर्भातील प्रस्ताव रविवारी सादर करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक प्रभारींची नियुक्तीही करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील मातोश्री मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गाावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष आशिष कदम, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, नाथा मातंडकर, वैभव रावराणे, राजू पावसकर, देवेंद्र देसाई, रशिद खान, संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव विलास पावसकर, सुशिल चमणकर, सतीश पाताडे, प्रांतिक सदस्य विलास गावकर, बाळा कोयंडे, प्रसाद कुलकर्णी, दीपक देसाई, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, केदार खोत, सत्यवान ऊर्फ बाबू परब, राजेश पाताडे, महेश चव्हाण व इतर उपस्थित होते.
अबिद नाईक म्हणाले, येणाऱ्या जि.प., पं.स. निवडणुकीत पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापल्या भागामध्ये निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन निवडणुकीसाठीचे काम सुरू करा. त्याचबरोबर निवडणूक प्रभारी यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन ज्या जि.प., पं.स. मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, तेथे बैठका घेत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर रविवारी खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांना युतीबाबत प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांची निश्चितीही करण्यात येणार असल्याचे श्री. नाईक म्हणाले. जिल्ह्यात भाजपा व शिंदे शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली असून पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत माझे बोलणे आले आहे. त्यांनी युतीबाबत जागांसंदर्भातील प्रस्ताव देण्याबाबत सांगितले आहे. एम. के. गावडे म्हणाले, प्रत्येक तालुक्यात तालुकाध्यक्षांनी रविवारी आपापला अहवाल जिल्हाध्यक्षांकडे द्यावा, जेणेकरून महायुती करण्यासंदर्भात चर्चा करत पुढील निर्णय घेणे सोपे होईल, सावळाराम अणावकर म्हणाले, पक्ष संघटना वाढविताना सर्वांना सोबत घेऊन काम करा. तसेच पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. यावेळी तालुकानिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली, त्यात सावंतवाडी, दोडामार्गसाठी उमाकांत वारंग व संदीप राणे, कणकवली, देवगड, वैभववाडी व मालवणसाठी सावळाराम अणावकर, कुडाळ व वेंगुर्लेसाठी एम. के. गावडे यांची नियुक्ती करण्यात आली.