

सिंधुदुर्ग : नगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ काही तासांवर आली आहे. रविवारी आणि सोमवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी निश्चित होणे सोडाच; अद्याप ना युती जाहीर झाली आहे, ना आघाडी. त्यामुळे इच्छुकांमध्ये आणि मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
गेल्या 4 तारखेला निवडणुका जाहीर झाल्या. त्याला आता अकरा दिवस झाले. एवढ्यात किमान महायुती आणि महाविकास आघाडीची घोषणा होणे आवश्यक होते. अशी काही घोषणा अद्याप झालेली नाही. एवढेच नव्हे तर युती किंवा आघाडी होणार नाही, असेही कुणी अद्याप जाहीर केलेले नाही. मुळात 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस सुरू झाला असला तरी पहिले तीन-चार दिवस उमेदवारी अर्ज दाखलच झाले नव्हते. त्यानंतर उमेदवारी निश्चित होतील असे वाटले. परंतु काही ठिकाणी अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत.
कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या चार नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून बर्याच ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र त्यापैकी अनेकांना पक्षाचे एबी फॉर्म मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज जरी दाखल केले तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मागेही घ्यावे लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी युती किंवा आघाडी झाल्याचे जाहीर करण्यात आले नाही. कणकवलीमध्ये संदेश पारकर यांनी पत्रकारा परिषद घेऊन शहर विकास आघाडी स्थापन करून आपण नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असे जाहीर केले. सर्वच पक्षांनी या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ठाकरे शिवसेनेने यापूर्वीच या आघाडीला पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ ठाकरे शिवसेना या आघाडीतून लढणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र शिंदे शिवसेना या आघाडीतून लढणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कदाचीत शिंदे शिवसेनेची भाजप बरोबर युतीही होवू शकते असे सांगितले जाते. अर्थात कणकवलीत अशी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याचे शनिवारी संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही.
सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेने सीमा मठकर यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना पाठिंबाही दिला आहे. मात्र काँग्रेसने आपली निर्णायक भुमिका जाहीर केलेली नाही. भाजपच्या संभाव्य उमेदवार श्रध्दाराजे भोसले यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. शनिवारी शिंदे शिवसेनेचे अर्ज दाखल होणार होते, मात्र ते थांबविण्यात आले आहेत. हे अर्ज रविवारी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावंतवाडीत युतीसाठी अजुनही प्रयत्न सुरू आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
मालवणात शिंदे शिवसेनेने ममता वराडकर यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने मालवणमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. परंतु त्यांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केले असले तरी नगराध्यक्षपदासाठी त्यांच्याकडून अर्ज दाखल केलेले नाहीत.
वेंगुर्लेमध्ये ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश निकम आणि सर्व नगरसेवक पदांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी विलास गावडे यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. तिथे महाविकास आघाडी होण्याची शक्यता कमी दिसते. मात्र भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून अद्याप उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे तिथे युतीची शक्यता कायम दिसते.