Sindhudurg News : मिठमुंबरीत कायाकिंग प्रकल्पावरून वाद; मच्छिमारांचा प्रकल्पाला विरोध

विशेष ग्रामसभेत निर्णय घेण्यावर एकमत; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला
Sindhudurg News : मिठमुंबरीत कायाकिंग प्रकल्पावरून वाद; मच्छिमारांचा प्रकल्पाला विरोध
Published on: 
Updated on: 

देवगड : मिठमुंबरी येथील बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्प सुरू करण्यावरून रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ, मच्छिमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. स्थानिक मच्छिमारांना विश्वासात न घेता हा प्रकल्प सुरू केला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायाला बाधा पोहोचण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अखेर देवगड पोलिसांनी हस्तक्षेप करून हा विषय सामोपचाराने सोडविण्याचे आवाहन केले. मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत याबाबत निर्णय घेण्यावर सर्वांचे एकमत झाल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला.

मिठमुंबरी येथील नरेश डामरी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत होता. यावेळी सरपंच बाळकृष्ण गावकर यांनी ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला परवानगी दिल्याचे सांगितले. पर्यटनवाढ, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि गावातील उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कायाकिंगमुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक स्टॉल, निवासव्यवस्था, वाहतूक तसेच अन्य व्यवसायांना चालना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्पकर्त्यांच्या वतीने अनिल कोरगावकर यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले. पर्यटन आणि मासेमारी हे दोन्ही व्यवसाय एकत्रितपणे चालू शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, स्थानिक मच्छिमारांनी जेटीवरून आपला उदरनिर्वाह चालत असून, प्रकल्पामुळे मासेमारीच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. पर्यटनाला विरोध नसला तरी स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी त्यांनी केली.

परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांनी सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, प्रकल्पकर्ते, ग्रामस्थ आणि मच्छिमारांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे अॅड. सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत चर्चा करून निर्णय घेण्यावर एकमत झाल्याने तूर्तास वाद शांत झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news