Sindhudurg Crime : अल्पवयीन मुलीवर ज्येष्ठाकडून लैंगिक अत्याचार

बांदा पंचक्रोशीतील प्रकार, संशयित दुकानदारावर पोक्सोंतर्गत गुन्हा व अटक
Sangli Crime News
अल्पवयीन मुलीवर अत्याचार Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

बांदा : बांदा पंचक्रोशीतील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या ६१ वर्षीय व्यक्तीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जयदेव विठ्ठल म्हाडगूत (६१) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पीडित मुलगी मे महिन्यात मॅगीचे पॅकेट घेण्यासाठी संशयिताच्या किराणा दुकानात गेली होती. त्यावेळी ती दुकानात एकटी असल्याचा फायदा घेत संशयिताने तिला दुकानातील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांपूर्वीही तिच्यासोबत अशाच प्रकारचे गैरकृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर मुलीच्या वागण्यात बदल झाला होता. घरातील व्यक्तीने तिला पुन्हा दुकानात जाण्यास सांगितल्यानंतर ती घाबरू लागली. त्यामुळे आईने तिच्याकडे विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी बांदा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश राठोड करीत आहेत.

अल्पवयीन मुलांनी घाबरू नये

गैरवर्तन अथवा अत्याचाराची कोणतीही घटना घडत असल्यास मुलांनी घाबरून जाऊ नये. त्याची माहिती तातडीने पालकांना किंवा विश्वासातील व्यक्तींना द्यावी. अशा घटनांबाबत पोलिसांकडून कोणतीही हयगय केली जाणार नाही. पालकांनीही मुलांच्या वागण्यात अचानक बदल जाणवल्यास त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधावा. अशा कोणत्याही प्रकारात बांदा पोलिस नागरिकांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर आहेत, असे आवाहन पोलिस सहा. निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news