

देवगड : देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आंबा नुकसानभरपाईचे ३० टक्केही वाटप अद्याप झाले नसून, याउलट कुडाळ तालुक्यात ९५ टक्के वाटप झाले आहे. कृषी विभागाच्या निष्क्रीय कारभारामुळे देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाईचे ३० टक्केही वाटप झाले नसून कृषी विभागाच्या या कारभारामुळे शासन बदनाम होत आहे, असा घणाघाती आरोप पं.स.सदस्य सदाशिव ओगले यांनी सभेत केला. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाईचे वाटप करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच पावसाअभावी भातशेती करपत असल्याच्या तक्रारी वाढत असताना पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाने कोणत्याही आदेशाची वाट न पाहता संबंधित कृषी सहाय्यकांसमवेत प्रत्यक्ष शेतपाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल चार दिवसांत सादर करावा, अशा स्पष्ट सुचना देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी कृषी विभागाला केल्या. त्याचबरोबर आंबा-काजू नुकसानभरपाईची किती रक्कम शेतकऱ्यांना मिळाली, किती लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आणि किती शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे, याची संपूर्ण आकडेवारी तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी तालुका कृषी विभागाला दिले.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पंचायत समिती सदस्य-सदस्या तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच कुणकेश्वर येथे ताज हॉटेल प्रकल्पाबाबत करार झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदस्य रविंद्र तिर्लोटकर व ज्येष्ठ सदस्य सदाशिव ओगले यांनी लक्ष वेधले. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने भातपिकावर संकट आले असून अनेक ठिकाणी भातशेती करपत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सभापती गणेश राणे यांनी पंचायत समिती आणि कृषी विभागाने संबंधित भागातील कृषी सहाय्यकांसह पाहणी करून पंचनामे करावेत व चार दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. आंबा-काजू नुकसानभरपाईचा प्रश्नही सभेत चांगलाच गाजला. नुकसानभरपाई जाहीर होऊनही देवगड तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. कृषी विभागाकडून केवायसीचे कारण पुढे केले जात असले तरी शेतकऱ्यांना ठोस माहिती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. देवगड तालुक्यात गणेश चतुर्थीच्या कालावधीत केवळ सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित ७० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असल्याचा मुद्दा सदाशिव ओगले यांनी उपस्थित केला. कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाईचे वाटप झाले असताना देवगडमध्येच हा प्रश्न का निर्माण झाला, अशी विचारणाही त्यांनी केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती राणे यांनी संबंधित मंडल अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सेवक यांनी दोन दिवसांत आपल्या दालनात सविस्तर खुलासा सादर करावा, असे निर्देश दिले. शेतकऱ्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेऊ नये, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ तातडीने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी बजावले. कोटकामते-किंजवडे परिसरातील शेतकऱ्यांना फार्मर आयडीची समस्या भेडसावत असल्याचा मुद्दाही सभेत मांडण्यात आला.