Sindhudurg Crime| शेअर मार्केटच्या नुकसानीतून ‘त्याचा’ बँकेवर डल्ला!

कुडाळातील बँक लुटणाऱ्या तरुणाची कथा
Sindhudurg Crime News
शेअर मार्केटच्या नुकसानीतून ‘त्याचा’ बँकेवर डल्ला!
Published on: 
Updated on: 

​कुडाळ : शेअर मार्केटमधील मोठे नुकसान आणि त्यातून डोक्यावर आलेले कर्ज फेडण्यासाठी पिंगुळी येथील भक्तराज सडवेकर या तरुणाने थेट कुडाळ शहरातील एसबीआय शाखेत धाडसाने डल्ला मारल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घडली. महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून तब्बल ३३ लाखांची रोकड लांबवणाऱ्या भक्तराज वासुदेव सडवेलकर (२८, रा. पिंगुळी काळेपाणी) या संशयित आरोपीला कुडाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​मंगळवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास संशयित भक्तराज याने कुडाळ पानबाजार शाखेत प्रवेश केला. तिथे त्याने एका महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवत पैशांची पिशवी बळकावली आणि तिला बँकेबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत आणले. मात्र, महिला कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.​ लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयित पिशवी घेऊन सुसाट पळ सुटला. नागरिकांनी सुमारे दोनशे मीटरपर्यंत त्याचा पाठलाग करत त्याला रस्त्यावरच असणाऱ्या गुलमोहोर हॉटेलजवळ गाठले. संतप्त जमावाने त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सुदैवाने, लुटलेली सर्वच्या सर्व ३३ लाखांची रोकड सुरक्षितपणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. बँक कर्मचारी सोनाली जळवी यांच्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.