Sindhudurg News : अनधिकृत पर्ससीन मासेमारीविरोधात मालवणातील पारंपरिक मच्छीमार आक्रमक

मत्स्य विभाग कार्यालयावर धडक
Sindhudurg News
अनधिकृत पर्ससीन मासेमारीविरोधात मालवणातील पारंपरिक मच्छीमार आक्रमक
Published on: 
Updated on: 

मालवण : देवगड येथील मच्छीमारांनी पारंपरिक मच्छीमारांवर मासे चोरीचे आरोप केल्यानंतर मालवणातील पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. अनधिकृत पर्ससीन मासेमारी आणि परराज्यांतील हायस्पीड नौकांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाल्याचा आरोप करत मच्छीमारांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आमच्यावर मासे चोरीचा आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत अनधिकृत मासेमारी रोखली नाही, तर तीव्र भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला.

पारंपरिक मासेमारी क्षेत्रात नौकांचे अतिक्रमण?

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृत पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला. परराज्यांतील हायस्पीड नौका पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी क्षेत्रात घुसून मासळी पकडत असल्याने स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात रामेश्वर मच्छिमार सोसायटी अध्यक्ष जगदीश खराडे यांनी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन मत्स्य विभागाला सादर केले. देवगड येथील मच्छीमारांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत पारंपरिक मच्छीमारांनी संबंधित नौकांच्या मासेमारीचे व्हिडीओ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. ट्रॉलिंगच्या नावाखाली अनधिकृत पर्ससीन मासेमारी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. समुद्रात १० ते १२ वाव अंतरावर, पारंपरिक मच्छीमारांच्या क्षेत्रात घुसून मासेमारी होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

मासळीचा तुटवडा; मच्छीमार आर्थिक संकटात

अनधिकृत मासेमारीविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त केला. मासळी मिळत नसल्यामुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मासेमारीसाठी होणारा खर्च आणि घटणारे उत्पन्न यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य विभागाकडे गस्तीसाठी सुसज्ज स्पीड बोट नसल्याने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचा आरोपही मच्छीमारांनी केला. समुद्रातील अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी नियमित गस्त आणि तातडीच्या कारवाईची मागणी त्यांनी केली.

कारवाई न झाल्यास स्वतः पुढाकार घेण्याचा इशारा

अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा मच्छीमार स्वतः पुढाकार घेतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असेही मच्छीमारांनी स्पष्ट केले.

मत्स्य विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच मच्छीमारांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले. यावेळी मत्स्य परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि मत्स्य अधिकारी रवींद्र मालवणकर उपस्थित होते.

रामेश्वर मच्छिमार सोसायटी अध्यक्ष जगदीश खराडे, श्रमजीवी रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, मच्छीमार नेते विकी तोरसकर, मत्स्य व्यावसायिक तथा ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, दिलीप पराडकर, सुजित मोंडकर आणि हेमंत जोशी आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news