

सावंतवाडी : मार्च 2024 मध्ये मळगाव येथून झालेल्या डंपर चोरीच्या तपासात सावंतवाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार असलेला दुसरा आरोपी धनाजी नागनाथ लोकरे (वय 35, रा. लवुळ, ता. माढा, जि. सोलापूर) याला तपास पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, 20 जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सालईवाडा-सावंतवाडी येथील फिर्यादी अभिषेक सावंत यांचा डंपर मार्च 2024 मध्ये मळगाव येथून चोरीला गेला होता. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी 2024 मध्येच सुनील कोळेकर नावाच्या पहिल्या आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीत सोलापूर परिसरातील आणखी तीन साथीदारांची नावे समोर आली होती, मात्र ते सर्व फरार होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस या फरार आरोपींच्या मागावर होते. काल, 16 जानेवारी रोजी गुन्ह्यातील सहभागी आरोपी धनाजी लोकरे हा पुणे येथे असल्याची माहिती मिळताच, सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक (झडख) प्रमोद पाटील आणि हवालदार रामदास जाधव यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या चोरीच्या साखळीतील उर्वरित दोन आरोपींचा शोध आता पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.