

अजित सावंत
कणकवली : सिंधुदुर्गात पावसाळ्यात भात लावणी हंगाम आणि नंतर भात कापणी हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’ साथीचा प्रादुर्भाव होत असे. दूषित पाणी, माती आणि संक्रमित उंदरांच्या मलमूत्रामुळे उद्भवणाऱ्या या साथरोगामुळे २०१६ पासून २०२४ या ९ वर्षात जिल्ह्यात ७७४ जणांना लेप्टोची लागण झाली होती. त्यात १९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, २०२५ आणि २०२६ या वर्षात लेप्टोचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यावर्षी तर पाऊस लवकर गेल्याने भात कापणीच्या वेळी तो धोका राहिलेला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गला सतावणारे हे लेप्टोस्पायरोसिसचे संकट तूर्तास तरी टळले, असेच म्हणावे लागेल.
पावसाळ्यात आणि पूरस्थितीत या आजाराचा धोका अधिक वाढतो. कोकणासारख्या भातशेती व पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात त्याचा अधिक प्रादुर्भाव होत होता. संक्रमित उंदरांच्या मलमूत्रातून लेप्टोचे जीवाणू बाहेर पडतात, त्यामुळे परिसरातील पाणी व माती दूषित होण्याची शक्यता असते. भात लावणी, चिखलात काम करणे आणि अनवाणी शेतात उतरणे यामुळे या आजाराचा धोका असतो. त्वचा आणि पायांमधील जखमांमधून हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे शेतकरी, सफाई कर्मचारी, गटारांची स्वच्छता करणारे कामगार आणि दूषित पाण्यात काम करणारे लोक हे या रोगाच्या जोखमीच्या गटात असतात.
‘लेप्टो’ची लक्षणे
अचानक ताप येणे व थंडी वाजणे, डोकेदुखी आणि विशेषत: पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अंगदुखी, अशक्तपणा, उलट्या होणे, डोळे लाल होणे, गंभीर स्थितीत डोळे व त्वचा पिवळी पडणे, लघवी कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा रक्तस्राव होणे अशा आजाराची लक्षणे असतात.
२०१६ पासून २०२६ पर्यंतचा आढावा
२०१६ पासून २०२६ पर्यंतचा आढावा घेतला तर गेल्या ९ वर्षांत ७७४ जणांना या रोगाची लागण झाली. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये २५ जणांना लागण, २ मृत्यू. २०१७ मध्ये ९० जणांना लागण, ३ मृत्यू. २०१८ मध्ये ३९ जणांना लागण,१ मृत्यू. २०१९ मध्ये ३५६ जणांना लागण, ३ मृत्यू. २०२० मध्ये २५१ जणांना लागण, ७ मृत्यू. २०२१ मध्ये ३१ जणांना लागण, मृत्यू नाही. २०२२ मध्ये एकाला लागण, मृत्यू नाही. २०२३ मध्ये एकाला लागण, १ चा मृत्यू तर २०२४ मध्ये ११ जणांना लागण तर २ मृत्यू. मात्र, २०२५ मध्ये एकाही रुग्णाला लागण नाही. २०२६ मध्येही आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.