Sindhudurg News : ‘मोक्का’पासून वाचवून जामीन मिळवून देतो!

अ‍ॅड. किशोर वरकवर 10 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा ;एकाला अटक, अ‍ॅड. वरक फरार
Sindhudurg Crime News
‘मोक्का’पासून वाचवून जामीन मिळवून देतो!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुडाळ : चेंदवण (ता. कुडाळ) येथील सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरणी आरोपी असलेल्या सिद्धेश शिरसाट याच्यावर मोक्का न लावता तसेच त्याचा जामीन सहज मिळवून देण्यासाठी तब्बल 10 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अ‍ॅड. किशोर वरक (रा. खानोली-वेंगुर्ले) आणि सुरेश दुर्गा झोरे (38, रा. हिर्लोक-कुडाळ) या दोघांविरुद्ध कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी खंडणीपैकी एक लाख रुपये ‘अ‍ॅडव्हान्स‘ स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींपैकी सुरेश झोरे याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून कुडाळ न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र मुख्य संशयित अ‍ॅड. किशोर वरक पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबतची फिर्याद सिद्धी सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ-बाजारपेठ) यांनी दिली असून खंडणीची ही मालिका जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 15 जुलै 2025 दरम्यान घडल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मोक्का लावणार असल्याची धमकी

एप्रिल 2025 मध्ये योगेश तुळसकर हा शिरसाट दाम्पत्यांच्या घरी आला. त्यावेळी त्याने सुरेश झोरेचा फोन येत असल्याचे सांगितले. झोरेने बिडवलकर बेपत्ता प्रकरणात सिद्धेशचा हात आहे; अ‍ॅड. वरक तक्रार देणार आहेत. त्रास नको असेल तर त्यांना भेटून प्रकरण मिटवा, असे तुळसकरने सांगितले. दरम्यान निवती पोलिसांनी बिडवलकर खूनप्रकरणी सिद्धेश शिरसाटला अटक केली. तो तुरुंगात असताना जुलैमध्ये तुळसकरने सौ. सिद्धी यांना फोन करून अ‍ॅड. वरक सरकारी वकिलांसोबत मिळून काम करत आहे. सिद्धेशवर मोक्का लावणार आहेत. तो लावला तर जामीन कधीच मिळणार नाही. मोक्का टाळायचा असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, असा धमकीवजा संदेश दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कुडाळ परिसरात लाखोंची सौदेबाजी

सौ. सिद्धी यांनी ही माहिती नवरा सिध्देशचा मित्र हार्दीक शिंगले याला दिल्यानंतर तुळसकर, शिंगले, वरक व झोरे यांची 3 जुलै 2025 रोजी सायं. 5.45 ते 7 वा. या वेळेत कुडाळ येथे बैठक झाली. यावेळी अ‍ॅड. वरकने प्रत्यक्ष 10 लाखांची डिल समोर ठेवली. सिद्धेशला मोक्का लावणार नाही, जामीन लवकर मिळवून देतो अशी ग्वाही देत त्याने 5 लाख अ‍ॅडव्हान्स मागितले. अखेर 1 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स स्वरूपात देण्यात श्री.शिंगले यांच्या मार्फत दिल्याचे सौ.सिद्धी यांना तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सिद्धेश शिरसाट याचा जामीन न्यायालयाने मंजूर केल्यानेआपण उर्वरित पैसे देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अ‍ॅड. किशोर वरक गायब; पोलिसांसमोर कोडे

या प्रकरणात अ‍ॅड. वरक याच्यावर गुन्हा नोंदीनंतर कुडाळ पोलिसांनी वरकच्या खानोली येथील घरावर धाड टाकली, मात्र तो पसार झाल्याचे आढळले. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अ‍ॅड. वरक व श्री. झोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(3), 308(7) व 3(5) अन्वये खंडणीसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news