

सूरज कोयंडे
देवगड ः ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला रविवार, 15 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. 15 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून मंगळवार, 17 रोजी दर्श अमावस्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग आहे. या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वरक्षेत्री वळू लागली आहेत.
यात्रोत्सवाचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. एस.टी., महावितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल याठिकाणी उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यांनी यात्रा परिसर फुलून गेला आहे. यात्रेच्या ठिकाणी पारंपरिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत. तसेच भेल, आईस्क्रिम, इतर हॉटेल्स या दुकानांनी समुद्रकिनारा व्यापला आहे.
यात्रोत्सवानिमित्त वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतूक या पुलावरून होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल. तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तारामुंबरी-मिठमुंबरी पूल मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजीक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, आचरा-मिठबांव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे टेहळणी पथक व देवस्थान ट्रस्टच्या स्वयंसेवकांचे पथक कार्यरत आहे. त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.
श्री कुणकेश्वर भेटीसाठी येणार 5 देवस्वाऱ्या
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी 5 देवस्वाऱ्या जाणार आहेत. यामध्ये श्री देव लिंगेश्वर पावणाई देवस्थान जानवली-कणकवली, श्री देव नागेश्वर पावणादेवी नागवे-कणकवली, श्री पावणाई रवळनाथ देवस्थान मालोंड बेलाचीवाडी-मालवण, श्री भैरवनाथ देवस्थान वरवडे-कणकवली व श्री देव गांगेश्वर देवस्थान नारिंग्रे-देवगड या देवस्वाऱ्यांचा समावेश आहे.
वाहतुकीच्या नियोजनात बदल
श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त कुणकेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीचे सुयोग्य नियोजन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कुणकेश्वर देवस्थानकडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. यात्रेकरू मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची दाट शक्यता आहे. यात्रा कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
कुणकेश्वर येथे देवगड-आचरा रोडवर तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले देवगड, कणकवली, आचरा व मालवण बसस्थानका पुढे लावलेल्या बॅरिकेटींगपासून कुणकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेश बंद आहे. यात्रा कालावधीत काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन तयार करण्यात आले आहेत. यात कुणकेश्वर-तारामुंबरी देवगड रस्ता आपत्कालीन मार्ग असल्याने संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. देवगड शहर-कुणकेश्वर मंदिर मार्गावर तारामुंबरी ब्रीज येथून सर्व प्रकारच्या वाहनांना तीन कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. लिंगडाळ तिठा -कुणकेश्वर मंदिर मार्गावर सुके तळे येथून सर्व प्रकारच्या वाहनांना 3 कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. मिठबावकडून येणाऱ्या मार्गावर कातवण पेट्रोलपंप येथून सर्व प्रकारच्या वाहनांना 5 कि. मी. परिसरात वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई आहे. हा आदेश पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नाही, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चोख पोलिस बंदोबस्त
कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक अप्पर पोलिस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, 5 पोलिस निरीक्षक, 21 सहा. पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 109 पोलिस अंमलदार, 10 वाहतूक पोलिस व 107 होमगार्ड असा 255 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चार आरोग्य पथके तैनात
आरोग्य विभागाकडून यात्रोत्सवासाठी चार आरोग्य पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. भक्तनिवास, कुणकेश्वर प्राथमिक शाळा, इळये प्रा. आ. केंद्र व मिठबांव प्रा. आ. केंद्र येथे ही पथके ठेवण्यात आली आहेत. 4 रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून 28 डॉक्टर्स व 122 आरोग्य कर्मचारी यात्रोत्सवासाठी आरोग्य विभागाकडून नियुक्त करण्यात आले आहेत.
23 एस्टी गाड्यांचे नियोजन
देवगड आगारातून 23 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देवगड आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली. यामध्ये देवगडमधून 10, नांदगांव 2, बागतळवडे 1, मोंडतर टेंबवली 1 , चाफेड भरणी 1, रेंबवली कुवळे साळशी 1, पोयरे खुडी नारिंग्रे 1, तेलीवाडी ताम्हाणेतर 1, शिरवली चौकेवाडी 1, नाद ओंबळ 1, आयनल कोळोशी 1, किंजवडे डोबवाडी 1, आरे निरोम 1 अशा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.