

देवगड : श्रावण मासाची सुरुवात, पहिला श्रावणी सोमवार आणि त्याच दिवशी आलेली नागपंचमी असा पवित्र योग जुळून आल्याने श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे शिवभक्तांचा जणू भवसागर उसळला होता. या पावन पर्वानिमित्त श्री देव कुणकेश्वराची श्रावणातील पहिली पूजा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सोमवारी पहाटे ५ वा. विधिवत धार्मिक वातावरणात झाली. सहा. धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी तसेच उद्योजक संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कोकणामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे घरोघरी श्रद्धेने पूजन केले जाते. त्यामुळे सकाळच्या सत्रात कुणकेश्वर येथे भाविकांची तुरळक गर्दी होती. मात्र, दुपारी १२ वा.नंतर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आ. प्रमोद जठार यांनी सपत्नीक श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देवगडचे उपसभापती अमोल लोके, पोलिस निरीक्षक शाम बुवा, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, विविध क्षेत्रांतील उद्योजक, राजकीय पदाधिकारी तसेच असंख्य भाविकांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.