Sindhudurg News : कुडाळात स्मार्ट कार्ड व्यवस्थेचा गोंधळ!

कार्ड मिळाले नाही, रिचार्जही होत नाही; मग सक्ती कशासाठी? नागरिकांचा सवाल
Sindhudurg News
कुडाळात स्मार्ट कार्ड व्यवस्थेचा गोंधळ!
Published on
Updated on

कुडाळ : एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्डच्या व्यवस्थेचा कुडाळ बसस्थानकात बुधवारी पुरता बोजवारा उडाला. स्मार्ट कार्ड नोंदणी, कार्ड वाटप आणि रिचार्जसाठी एकाच वेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला व मुली दाखल झाल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी झाली. त्यातच स्मार्ट कार्ड नोंदणी व रिचार्जसाठी असलेली मशीन सर्व्हर डाऊनमुळे बंद पडल्याने नागरिकांचा संताप झाला. तासनतास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. संतप्त महिलांसह नागरिकांनी संबंधितांना जाब विचारत संताप व्यक्त केला.

नोंदणी करूनही कार्ड हातात नाही!

नोंदणी केलेल्या नागरिकांना ३१ ऑगस्टपूर्वी कार्ड उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही अनेक नागरिकांना कार्ड मिळालेले नाही. दुसरीकडे, १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने कार्डसाठी दोनशे रुपये भरूनही कार्ड हातात न मिळालेल्या प्रवाशांना तसेच कार्ड मिळूनही रिचार्जच बसत नसल्याने एसटी बसमधून प्रवास करताना पूर्ण तिकीटदर भरावा लागत आहे. यामुळे कार्डसाठी पैसे भरून, तासनतास रांगेत उभे राहून नोंदणी करूनही कार्ड न मिळालेल्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवासी आणि वाहकांमध्ये विनाकारण शाब्दिक खटके उडण्याचे प्रकारही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

‘सर्वांना कार्ड द्या, मगच सक्ती करा’

‘कार्डचे वाटप पूर्ण झालेले नाही, ज्यांना कार्ड मिळाले आहे त्यांचे रिचार्ज होत नाही; मग प्रवासासाठी घाईघाईने कार्डची सक्ती कशासाठी?’ असा संतप्त सवाल महिलांसह नागरिकांनी केला. सर्व पात्र प्रवाशांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतरच सवलतीच्या प्रवासासाठी त्याची सक्ती करण्यात यावी. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था ठेवावी, अशी जोरदार मागणी यावेळी नागरिकांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news