

कुडाळ : कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे मुख्य रस्त्यालगतच्या आरोग्य विभागाच्या शासकीय जागेतील अतिक्रमण करून उभारण्यात आलेले हाॅटेल हटविण्यावरून शुक्रवारी रात्री प्रशासनासह दोन गट आमने-सामने आल्याने जोरदार वाद झाला. सुरूवातीला अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या प्रशासकीय यंत्रणा आणि हाॅटेल मालक-चालक व नागरिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह न.पं.चे मुख्याधिकारी यांनाही हाॅटेल मालक-चालक व नागरिकांनी जाब विचारत धारेवर धरले. त्याच दरम्यान दोन गट समोरा-समोर आल्याने वाद पेटला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मुख्य रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सदरील हाॅटेल मालकाने सामान बाजूला घेतले. त्यानंतर प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात आली.जन्मास्ष्टमीच्या दिवशीच जवळपास सहा तासाहून अधिक काळ हे कारवाई नाट्य सुरू होते.
राजमाता जिजाऊ चौक नजिकच्या आरोग्य विभागाच्या शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या सदर हाॅटेलवर कारवाई करण्यासाठी आरोग्य-नगरपंचायत प्रशासनाचे पथक पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी साय.पावणे सहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. यावेळी सदर हाॅटेल मालक-चालक व नागरिकांनी त्यांना विरोध करीत, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, दोन दिवस थांबवण्याची विनंती केली. मात्र प्रशासकीय यंत्रणा कारवाईवर ठाम होती. त्यामुळे अधिकारी व हाॅटेल मालक-चालक आणि नागरिकांच्या एका गटाने त्यांना धारेवर धरीत आरोग्य विभागाच्या जागेतील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी,मग आम्ही आमचे साहित्य स्वतःहून काढून घेऊ असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने अखेर हाॅटेल चालकाने स्वतः अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली मात्र तेथे चौकात असलेल्या विरोधी गटानेही आक्रमक भूमिका घेत संपूर्ण अतिक्रमण आत्ताच हटविले पाहीजे अशी भूमिका घेतली. त्यातच अतिक्रमण हटविण्यासाठी आलेला जेसीबीही अडविण्याचा प्रयत्न झाल्याने दोन्ही गट पोलिसांच्या समोरच आमने-सामने आल्याने वाद पेटला. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक बाचाबाचीही झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या गटांना बाजूला केला.
कुडाळचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संजय वाळके, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील, न.पं.मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. त्यांनी सदरील हाॅटेल मालक-चालक व नागरिकांशी वारंवार चर्चा करून सहकार्य करण्याची विनंती केली मात्र हाॅटेल चालक व एका गटाने आम्ही आमचे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतो, पण आधी एक नंबर पासूनच्या अतिक्रमणांवर कारवाईचे लेखी पत्र द्यावे अशी मागणी केली. त्यावरून प्रशासन व त्या गटात पुन्हा बाचाबाची झाली. तर दुसरीकडे या कारवाई दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांच्यासह विरोधी गटाने जेथे यंत्रणा कारवाईसाठी आलीय तेथील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी भूमिका घेतली. दोन्ही गटांसह प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वातावरण तंग बनले. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दोन्ही गटांना शांत राहण्यासह प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना केली. दरम्यानच्या वेळी माजी आमदार वैभव नाईक यांनीही व्हिडिओ काॅलद्वारे मुख्याधिकारी व आरोग्य अधिका-यांशी चर्चा करीत रात्रीच्या वेळी अशाप्रकारची अचानक कारवाई होऊ शकत नसल्याचे सांगितले. परंतू मुख्याधिका-यांनी आरोग्य विभागाच्या पत्राचा उल्लेख करीत कितीही वाजले तरी आजच कारवाई पूर्ण होणार असून, आरोग्य विभागाच्या पत्रानुसार सर्वसमावेशक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. चर्चेला आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पाटील व डाॅ.वाळके हतबल होऊन मागे परतले तर मुख्याधिकारी ठाण मांडून होते.
अखेर सदरील हाॅटेल चालकाने सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरू होती. दरम्यानच्या वेळी हाॅटेल चालक महिलेला भोवळ आल्याने प्रकृती बिघडली. त्यांना लागलीच रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हाॅटेल मधील सर्व सामान बाहेर काढल्यानंतर रात्री बारा नंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्यात आले. लगतची झुणका भाकर केंद्राचीही इमारत तोडण्यात आली. आरोग्य विभागाच्या जागेत अन्य अतिक्रमणे असताना एकच अतिक्रमण हटविण्यासाठी राजकीय दबाव वापरण्यात आल्याचा आरोप यावेळी सदरील हाॅटेल मालक-चालक व काही नागरिकांनी यावेळी केला. सणा सुदीच्या दिवशी एवढी यंत्रणा रात्रीच्या वेळी कामाला लागल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाकडून ज्यादा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान आरोग्य विभागाने शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या अन्य काही जणांना नोटीसा बजावत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.