

Kudal Gram Panchayat by Election
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील १५ पैकी तब्बल १० ग्रामपंचायतींमध्ये 'बिनविरोध'ची परंपरा कायम राहण्याची चिन्हे आहेत, तर कडावल आणि कालेली या दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
कुडाळ तालुक्यातील ओरोस बु., कडावल (सदस्य पदे), कसाल, घावनळे, नानेली, निवजे, बांबुळी, बिबवणे, वालावल आणि हिर्लोक या १० ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या सदस्य पदांसाठी स्थानिक पातळीवर समझोता झाल्याचे चित्र आहे. या जागांवर केवळ आवश्यक तेवढेच अर्ज आल्याने या निवडणुका बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामविकास आणि निवडणुकांचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यात कौतुक होत आहे. दुसरीकडे अणाव, कालेली, गावराई, चेंदवन व राणबांबुळी या ग्रामपंचायतींमध्ये मात्र प्रत्यक्ष निवडणूक रंगणार आहे.
एकीकडे बिनविरोधचे वारे वाहत असताना, कडावल ग्रामपंचायतीत मात्र संपूर्ण निवडणूक होत असल्याने येथे मोठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तत्कालीन सरपंच शितल कल्याणकर यांच्यासह सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे येथे सरपंच व ७ सदस्य अशा सर्व जागांसाठी रणसंग्राम होणार आहे. दुसरीकडे, कालेली ग्रामपंचायतीत मोठ्या राजकीय नाट्यानंतर ही निवडणूक लागली आहे. माजी सरपंच आरोही चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आता थेट लढत होणार आहे. या दोन्ही गावांच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणूक होणाऱ्या १५ ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. विशेषतः वालावल, कालेली आणि गावराई येथे उमेदवारांनी विशेष उत्साह दाखवला आहे. ७ एप्रिलपासून सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया १३ एप्रिल रोजी पूर्ण झाली. आता या अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होणार असून, १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान व २९ एप्रिल रोजी कुडाळ तहसील कार्यालय येथे मतमोजणी पार पडणार आहे.