

एस. एस. धुरी
आरवली : ग्रामीण भागातील शेतकर्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आणि नगदी पीक असलेल्या कोकमला या वर्षी मान्सूनपूर्व पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दोन दिवस पडलेल्या पावसाने बर्याच शेतकर्यांची कोकम पावसामुळे गळून पडली व खराब झाली. त्यामुळे यावर्षी अवघे २० टक्के उत्पादन शेतकर्यांच्या हाती लागले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा, काजू प्रमाणेच कोकम उत्पादक शेतकर्यांना लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील कोकम प्रक्रिया उद्योगाला बसला आहे .
जिल्ह्यात प्रामुख्याने नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून कोकम उत्पादन मिळते. अलीकडेच कोकमला 'जीआय' मानांकन प्राप्त झाले आहे . देशातील केरळ, कर्नाटकातील किनारपट्टी प्रदेश, गोवा आणि कोकण या भागात मिळून एकूण ९३ टक्के कोकमचे उत्पादन होते. मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा, काजूबरोबरच कोकम उत्पादनालाही फटका बसला आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादन व प्रक्रिया उद्योगावर होणार आहे.
कोकमचे एकूण १३ हजार मेट्रिक टन उत्पादन भारतात होते. त्यापैकी ९३ टक्के कोकम उत्पादन हे कर्नाटक, गोवा, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होते. यावर्षी सातत्याने असलेले दमट हवामान व अवकाळी पाऊस यांचा थेट परिणाम कोकम उत्पादनावर झाला आहे. यावर्षी केवळ ४० टक्केच फलधारणा झाली होती, त्यापैकी फक्त २० टक्केच एवढे नगण्य उत्पादन मिळाले आहे. अवकाळी पाऊस व दमट हवामान यामुळे फळगळती झाली. त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली.