

कणकवली ः सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) यांचा २४ फेब्रुवारी रोजी ओसरगाव येथील महामार्गानजीक डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर पेट्रोल ओतून त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली होती. हा खून दागिन्यासाठी केला असल्याची कबुली आरोपीने मंगळवारी (दि.४) पोलिसांना दिली. वितोरीन रुजाय फर्नांडीस (रा. वेंगुर्ले, टांक) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने सुचिता सोपटे हिचा खून केला असला तरी खूनाचा कट रचला नव्हता, असेही त्याने पोलिस तपासात सांगितले. दागिन्यांच्याच हव्यासापोटीच त्याने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य कोणतेही कारण सध्यातरी पुढे आलेले नाही. तसेच या खुनात आणखी कोणाचाही सहभाग नसल्याचेही स्पष्ट होत आहे. आणखी तीन दिवस आरोपी पोलिस कोठडीत असल्याने काही प्रश्नांची उत्तरे काही बाबींचा तपास होईल, अशी शक्यता आहे.
या गुन्हयात वापरलेल्या पांढर्या रंगाच्या इर्टिगा कारवरून कणकवली पोलिस आणि एलसीबीने या खूनाचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले होते. प्रथमदर्शनी आर्थिक कारणातूनच खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान आरोपीला न्यायालयाने ८ दिवसांची म्हणजे ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. या तपासात आरोपीने महिलेचे घेतलेले दागिने, तिचे दोन मोबाईल आरोपीच्या घरातून हस्तगत केले होते. तसेच सोनाराकडे विकलेले दागिनेही हस्तगत केले होते. आरोपीची व महिलेची पुर्वीपासून ओळख होती. खून झाला त्या घटनेच्या आदल्यादिवशी आरोपी महिलेला घेवून कोल्हापूरला गेला होता. त्यामुळे तो कोल्हापूरला का गेला होता? याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला कोल्हापूरला नेवून तपास केला होता. या तपासात अनेक बाबी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा खून दागिन्यांच्याच हव्यासापोटी केल्याचे त्याने कबूल केले आहे.
आरोपी व सुचिता सोपटे कोल्हापूरला ते गेल्याचे आणि आल्याचे आंबोली येथील चेकनाक्याच्या सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर ते कुडाळला आले. कुडाळमध्ये एका लॉजमध्ये सुचिता सोपटे ही राहिली तर आरोपी आपल्या गाडीने निघून गेला हे ही सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे. तर घटना घडली त्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी सकाळी तो तिला नेण्यासाठी आला. त्यानंतर ते मालवणसह अनेक ठिकाणी फिरले. सायंकाळी तो तिला घेवून कणकवलीत ओसरगाव येथे आला. त्या महिलेचे काही दागिने त्याच्याकडे होते. हे दागिने तिने आपल्या जावेकडून घेतले होते. कदाचित त्या महिलेने दागिने देण्यासाठी तगादा लावला असेल आणि त्या रागातून आरोपीने तिला ओसरगाव येथे आणून तिचा खून केला असेही तपासात पुढे येत आहे. ज्याठिकाणी तिला जाळले त्याच ठिकाणी तिचा खून केल्याचे त्याने पोलिस तपासात सांगितले. खूनासाठी वापरलेला शॉकप्सरचा रॉड आणि पेट्रोलचा कॅन कसाल पुलाजवळून पोलिसांनी जप्त केला आहे.