

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. कणकवली एसटी बस स्थानक, कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ तसेच कणकवली पोलीस ठाणे येथील सार्वजनिक गणेशोत्सवांना ना. राणे यांनी भेट दिली.
कणकवली एसटी बस स्थानक येथे विराजमान श्री गणराया मंत्री राणे यांनी पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विभाग नियंत्रक दीपक घोडे, नीलेश लाड यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एसटी बस स्थानकातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ना. राणे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस गाड्यांचे करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ना. नितेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ, कणकवली यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कणकवली पोलीस ठाण्यात विराजमान गणपती बाप्पाचेही ना. णे यांनी दर्शन घेतले. पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ना. राणे यांचे स्वागत केले. पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या शालेय जनजागृतीपर देखाव्याची पालकमंत्री ना. राणे यांनी पाहणी केली व या देखाव्याचे त्यांनी कौतुक केले. पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, सचिन माने, विनोद चव्हाण आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.