Sandesh Parkar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपस्थिती

‘ती’ बैठक नगरपालिकांशी संबंधित प्रश्नांबाबत : संदेश पारकर यांचे स्पष्टीकरण
Sandesh Parkar
Sandesh Parkar
Published on: 
Updated on: 

कणकवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बोलवलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या बैठकीला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती दर्शविल्याने त्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेवून विचारणा केली असता राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षांची ती बैठक बोलवली होती. शहरांच्या विकासाला निधी मिळावा, नगराध्यक्षांना पुन्हा अधिकार मिळावेत, नगराध्यक्ष व प्रशासन यांच्यातील समन्वय अशा विविध प्रश्नांशी संबंधित ती बैठक होती. त्या बैठकीचा कुणी राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

संदेश पारकर म्हणाले, २१ डिसेंबरला आपल्या नगराध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. यापूर्वीही आपण नगराध्यक्षांच्या प्रशिक्षणासाठी म्हाळगी प्रबोधिनी येथे उपस्थित होतो. उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला आपल्याला रितसर निमंत्रण होते. जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पुन्हा त्यांचे अधिकार मिळावेत अशी नगराध्यक्षांची मागणी आहे. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्यामध्ये समन्वय साधुन विकासाला गती मिळावी याबाबतही चर्चा झाली. या बैठकीत कणकवली शहराच्या विकासासंदर्भात जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित करण्यासाठी आपण हजर होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी नगराध्यक्षांचे अनेक प्रश्न जाणून घेतले. नगराध्यक्षांना पुन्हा अधिकार देण्याची ग्वाही त्यांनी दिली असे पारकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण गतवर्षी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो. त्यामुळे शहराच्या विकासाला निधी मिळावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना आपण भेटत असतो. त्यामुळे त्यात कुठलाही राजकीय अर्थ कुणी काढू नये असेही संदेश पारकर म्हणाले.

दरम्यान संदेश पारकर यांच्या या भेटीबाबत माजी आ.वैभव नाईक म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीपूर्वीच संदेश पारकर यांनी ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे दिला होता. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे शहराच्या विकासाच्या प्रश्नांसाठी ते सत्ताधाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले असतील असे नाईक म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.