

दोडामार्ग : कळणे गावात शनिवारी सायंकाळी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी पुरुषोत्तम बळीराम देसाई यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
देसाई कुटुंबीय शनिवारी सायंकाळी ७ ते ८.१५ वा. दरम्यान गावातील हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. सुमारे ८.३० वा. त्यांचे भाऊ कमलाकर देसाई घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करताच कागदपत्रे व पर्स अस्ताव्यस्त पडलेली दिसली. स्वयंपाकघरातील मागील दरवाजा उघडा असल्याचेही आढळून आले. तसेच घरावरील चार ते पाच कौले काढलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे ती कौले काढून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचा अंदाज वर्तवला जात झाले.
घरातील दुसऱ्या खोलीतील तीन कपाटे उघडून त्यातील सर्व कपडे बाहेर फेकण्यात आले होते. चोरट्यांनी पर्समधील ३० हजार रुपये, शर्टाच्या खिशातील १ हजार रुपये तसेच एक सोन्याची नथ असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील सुमारे २५ ते ३० किलो काजूही लंपास केल्याचे उघड झाले आहे. दोन वर्षांपूर्वीही याच घरात अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्यावेळी केवळ ५ हजार रुपये चोरीस गेले होते, मात्र तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. यावेळी मात्र घडलेल्या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.