Sindhudurg News|आशियेत गडनदीपात्रात उभारला कच्चा बंधारा

आशिये ग्रा. पं. चा पुढाकार; परिसरातील गावांना होणार लाभ
Bandhara News
आशियेत गडनदीपात्रात उभारला कच्चा बंधारा
Published on: 
Updated on: 

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून, स्वखर्चाने तसेच ग्रामपंचायती आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वनराई व कच्चे बंधारे उभारण्यात येत आहेत. कणकवली तालुक्यात जवळपास दोन हजार वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांच्या पुढाकाराने गडनदीपात्रात होणारा हा बंधारा जलसंधारणासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कणकवली पं.स. उपसभापती सोनु सावंत यांनी व्यक्त केला.

आशिये ग्रा.पं.च्या पुढाकाराने आणि जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके यांच्या सहकार्याने बानेवाडी गणपती साना गडनदी पात्रात कच्चा बंधारा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ उपसभापती सोनू सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच महेश गुरव, उपसरपंच संदीप जाधव, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, आशिये माजी सरपंच शंकर गुरव, पांडुरंग बाणे, बुध अध्यक्ष सचिन गुरव, पत्रकार संजय बाणे, सुनील बाणे, प्रवीण ठाकुर, समीर ठाकुर, किशोर बाणे, दिगंबर वर्दम, ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर, भरत तळवडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बंधारा कामासाठी श्रमदान करणाऱ्या सर्वांचे ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर यांनी आभार मानले.

या बंधाऱ्याचा लाभ केवळ आशिये गावालाच नव्हे, तर वागदे, सातरल, कासरल आदी पंचक्रोशीतील गावांनाही होणार आहे. बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या बंधाऱ्याचा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
- सोनू सावंत, उपसभापती-कणकवली पं. स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.