

कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा असलेला करूळ घाट गेले 11 महिने नूतनीकरणाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून घाटातून वाहतूक सुरू करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र, वाहतूक सुरू करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. 15 डिसेंबरपर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल, तर जानेवारी 2025 पासून घाटातून पूर्णपणे वाहतूक सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, घाटातील अपूर्ण काम पाहता दिलेली डेडलाईन तरी ते पाळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
करूळघाट 22 जानेवारी 2023 पासून नूतनीकरणाच्या कामासाठी सुरुवातीला 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले होते. अडीज महिन्याने कामाचा आढावा घेऊन पुन्हा 31 मे पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यास मुदत देण्यात आली. मात्र या कालावधीतही काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे 10 जून, 10 जुलै अशा तारखा प्रशासनाकडून देण्यात आल्या. दरम्यान जुलैमध्ये झालेल्या पावसाने नवीन बांधलेल्या संरक्षक भिंतीसह रस्ताच वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले.याबाबत सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी आवाज उठवला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खराब झालेले काम परत संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. यादरम्यान पावसाचे चार महिने निघून गेले. तर पावसाळा कमी होऊन आता दोन महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. मात्र घाटातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
विधानसभा निवडणुकीच्या आधी उबाठा सेनेकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खारेपाटण येथील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी 11 नोव्हेंबर रोजी घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे तेही आश्वासन हवेत विरले आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना विचारणा केली असता, 15 डिसेंबरपासून एकेरी व जानेवारीत पुर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र घाटातील कामाची सद्यस्थिती पाहता ही डेडलाईनही हुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घाटमार्ग बंद असूनही ज्या गतीने काम होणे अपेक्षित आहे त्या गतीने काम केले जात नाही. त्यामुळे तब्बल वर्षे होऊनही अद्याप काम पूर्ण होऊ शकले नाही. घाट मार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यांकडून घाटाचे संपूर्ण रुपडे पालटणार अशी अपेक्षा केली जात होती. वारंवार घाटातील होणारी पडझड असेल, रस्त्याची दुरावस्था असेल यातून कायमची सुटका होऊन मार्ग वाहतुकसाठी सुसज्ज होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे जरी काही महिने वाहतूक बंद राहिली, त्यामुळे त्रास झाला तरी घाटमार्ग कायमस्वरूपी चांगला होईल अशी अपेक्षा होती. या सर्वांचा घाटातील रखडलेले काम व निकृष्ट दर्जाचे काम यामुळे अपेक्षाभंग झाला आहे. जवळपास वर्षभर घाटातील वाहतूक बंद आहे. त्याचा व्यापारी, वाहतूकदार, पर्यटक, हॉटेल व्यवसाय यांच्यासह सर्वांवरच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे. यावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या जिल्ह्यात ऊस तोड सुरू असून करूळ घाट बंद असल्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाटातून सुरू आहे. भुईबावडा घाटातील अरुंद रस्ता, नागमोडी वळणे यामुळे घाटातून पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नाही. त्याशिवाय अंतर वाढत असल्यामुळे त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकर्यांना बसत आहे. गेली तीन वर्षे ऊस वाहतूकीच्या प्रश्नामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याचा परिणाम दरवर्षी ऊस उत्पादन क्षेत्रात वर्षागणिक घट होत असल्याचे दिसत आहे.
करूळ घाटातील काम अर्धवट असताना करुळच्या पुढे नवीन रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे. खरेतर घाटातील काम जलदगतीने पूर्ण केले तर वाहतूक सुरू होणार आहे. मात्र ते काम अपूर्ण असताना ठेकेदाराने पुढचे काम वेगाने सुरू केले आहे. सध्या घाट बंद असल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याचा फायदा घेत घाटातील काम अर्धवट ठेऊन पुढचे काम विना अडथळा रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे घाटातील कामाला प्राधान्य देऊन ते काम पूर्ण करून वाहतूक सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.