

ओरोस : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या ११८ डॉक्टर्सना वेतन अदा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी प्रशिक्षणार्थी ११८ डॉक्टरांनी शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन छेडले. जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला. परिणामी, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांची गैरसोय होण्याची भीती आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत शेकडो प्रशिक्षणार्थी डॉक्टर रुग्णांना १२ ते २४ तास सेवा देतात. यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना शासनाकडून ‘जेम्स मॅक्स’च्या माध्यमातून वेतन दिले जाते. मात्र, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजअंतर्गत जिल्हा रुग्णालयात कार्यरत डाॅक्टर्सना गेले दोन महिने वेतनच अदा झाले नसल्याचे या डाॅक्टरांचे म्हणणे आहे. प्रशिक्षित डॉक्टरांना मेस चालकाकडून जेवण मिळणेही दुरापास्त झाले आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडले. जोपर्यंत आम्हाला वेतन अदा होत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयात काम करणार नाही, असा पवित्रा या डॉक्टरांनी घेतला आहे. डाॅ. श्रेयस वाघमोरे, डाॅ. सिद्धी सातार्डेकर, डाॅ. पंकज ढोरे, डाॅ. दीपक निमकर, डाॅ. हर्ष शिंगारे आदींसह ११८ प्रशिक्षित डॉक्टर यात सहभागी झाले होते.