Sindhudurg News : रिव्हर्स मायग्रेशनसाठी दरडोई उत्पन्‍न वाढ

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन; पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती
Sindhudurg News
सिंधुदुर्गनगरी : तज्ज्ञ मंडळींसमोर बोलताना पालकमंत्री नितेश राणे. सोबत सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महेश पोहनेरकर.
Published on: 
Updated on: 

सिंधुदुर्ग: जिल्ह्याचा विकास करताना जिल्ह्यातील प्रत्येक माणसाचे जीवनमान उंचावायला हवे, रिव्हर्स मायग्रेशन हे मिशन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे चालल्या असून त्या अधिक मजबूत करणे आणि यापुढे दर्जेदार जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून जिल्ह्यातील तज्ज्ञ लोकांनी त्यासाठी एकत्रित काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

सिंधुदुर्ग बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्ह्याच्या विकासावरील चर्चासत्रात जिल्ह्यातील तज्ज्ञ लोकांच्या समोर मंत्री नीतेश राणे बोलत होते. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे सी ई ओ अनिरुद्ध देसाई, जि. प. सदस्य मनोज रावराणे, महेश पोहनेरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रणय तेली, प्रसाद देवधर, संध्या तेरसे, महेश ठाकूर, अशोक सारंग, महेश गोखले व इतर तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.

पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीं यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास कसा करावा याबद्दल आपली मते व्यक्त करावीत, सरकारच्या वतीने पालकमंत्री या नात्याने आपण निश्चितपणे विकासासंबंधीच्या सूचना अमलात आणू. परंतु जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट हे जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान उंचवावे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढवावे हेच असायला हवे. कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग या क्षेत्रातील विकास दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने व्हायला हवा. आज आपल्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अडीच लाख इतके आहे हे दरवर्षी ५० हजाराने कसे वाढेल, याचा आराखडा आपण सर्वांनी तयार करूया.

रिव्हर्स मायग्रेशन ही अतिशय महत्त्वाचे मोहीम आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेला तरुण जिल्ह्यात परत यावा आणि जिल्ह्यातील शिकलेल्या तरुणाला इथेच नोकरी मिळावी यासाठी आपले आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. शिरोडा येथील ताज हॉटेल प्रकल्प, कुणकेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल प्रकल्प हे त्यासाठीच उभारले जात आहे. केवळ पर्यटन,कृषी आणि मासेमारी यावरच आर्थिक विकास अवलंबून ठेवून चालणार नाही तर गोव्याप्रमाणे जहाजे बनविणारे कारखाने जिल्ह्यात उभे करावे लागतील आणि आम्ही ते करत आहोत.तळवणे येथे हा प्रकल्प सुरू झाला आहे आणि लवकरच देवगड येथे सुद्धा हा प्रकल्प सुरू होणार आहे. जहाजे बांधणीच्या उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होतात, याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले

सिंधुदुर्ग बँकेमार्फत जिल्ह्यातील नवोदित उद्योजक कर्ज घेतात ते फार कमी असते, त्या तुलनेत जिल्ह्या बाहेरील उद्योजकांची कर्ज मागणी मोठी असते,याकडे लक्ष वेधत मंत्री नीतेश राणे म्हणाले, जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात उद्योगासाठी कर्ज घेऊन उद्योजक आणि रोजगार निर्मिती करायला हवी. आपल्या जिल्ह्यातही काही यशस्वी उद्योजक आहेत.त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासासाठी फार मोठा वाव आहे, सिंधुदुर्ग जिल्हा सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. त्यानंतरही लोकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दुष्काळाशी सामना करण्याचा निर्णय घेतला. सरकारने सकारात्मक वातावरण जिल्ह्यात ठेवले.१० हजार पेक्षा जास्त वनराई बंधारे बांधले. त्याबरोबरच अनेक विकास कामांना धडाधड सुरुवात केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्र समोर अशा पद्धतीने आदर्श निर्माण केला आहे. महिला बचत गट सुद्धा मेहनत घेऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहे, असे कौतुकही पालकमंत्र्यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.