

देवगड; पुढारी वृत्तसेवा : ई-स्टोअर कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना भरघोस परताव्यातून फायदा आहे. तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम रोख स्वरूपात तसेच बँकिंगद्वारे गुंतवणूकदारांकडून घेऊन ती रक्कम मुदत संपूनसुद्धा परत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांची एकूण 26 लाख 14 हजार 210 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या अपहार केल्याप्रकरणी ईस्टोअर कंपनीचे चार संचालक व सात मुख्य एजंटांसह एकूण 11 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा देवगड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2022 या कालावधीत घडली. या कारवाईने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
चैतन्या चेतन तारकर (31, रा. तारामुंबरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान व मुकेश तेली ( रा. दिल्ली) यांनी ई-स्टोअरमधील वेदिक आयुरकेअर प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य एजंट म्हणून अनिल काशीराम जाधव (मुंबई), संजना परांजपे (पनवेल), शैलेंद्र बाबुराव पेडणेकर (सावंतवाडी), रौनक पटेल (कणकवली), सचिन सावंत (कुडाळ), किरण कदम (कुडाळ), दे. बा. परब (देवगड) या एजंटांद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांत तसेच देवगड येथील बँक ऑफ इंडिया देवगड शाखेच्या वरील गाळ्यामध्ये मुख्य एजंटांनी ई स्टोअर मधील वेदिका आयुर केअर नावाचे कंपनीचे कार्यालय उघडून गुंतवणुकदार लोकांना ई स्टोअर मधील वेदिका कंपनीची ग्रोसरी, हेल्थ फॅमिली पॅकेज, वेदा पॉईट, वेदा माल्ट, मल्टीपल फॅमिली पॅकेज या नावाच्या पॅकेजवर भरघोस परतावा व फायदा असल्याचे तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या स्कीमद्वारे गुंतवणुकदारांकडून रोख तसेच बॅकींगद्वारे रक्क्कम स्वीकारून एकूण 54 गुंतवणुकदारांची फसवणूक केली. परतावा रक्कमेची मुदत संपून सुध्दा ती परत न करता एकूण 26 लाख 14 हजार 210 रुपये रकमेचा आर्थिक अपहार केला. तसेच ईस्टोअरमधील वेदीक आयुरकेअरचे मुख्य संचालक व एजंट यांनी देवगड परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गुंतवणुकदारांची अशाचप्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक करून रकमेचा अपहार केला आहे असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी या कंपनीचे मुख्य संचालक फैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली तसेत एजंट अनिल काशीराम जाधव, संजना परांजपे, शैलेंद्र बाबुराव पेडणेकर, रौनक पटेल, सचिन सावंत, किरण कदम, दे.बा. परब यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.