Sindhudurg News : बेकायदेशीर शस्त्रे व खवल्यांची तस्करी : आठवा आराेपी जेरबंद

संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी
Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

सावंतवाडीः सावंतवाडी तालुका आणि लगतच्या परिसरात बेकायदेशीर गावठी बंदुका, जिवंत काडतुसे आणि संरक्षित वन्यजीव असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करीविरोधात बांदा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबवली आहे. या वेगवेगळ्या कारवायांमध्ये आतापर्यंत एकूण आठ संशयितांना अटक करण्यात आली असून बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

या प्रकरणातील आठवा आरोपी शांताराम पांचाळ (वय ५६, रा. मोरे माणगाव, ता. कुडाळ) याला सावंतवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तपासादरम्यान पांचाळ याने या प्रकरणात ठासणीची बंदूक तयार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जयेंद्र सावंत याच्याकडे कसून चौकशी केली असता ही बंदूक त्याला प्रसाद प्रभाकर कुबल (४३, रा. नेतर्डे) याने पुरवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने नेतर्डे येथे छापा टाकून प्रसाद कुबल याला अटक केली. कुबलच्या चौकशीतून या बेकायदेशीर व्यवहाराचे धागेदोरे गोव्यापर्यंत पसरल्याचे समोर आले. उसने राजू गोपाळ पाटील (वय ३३, रा. कासारवर्णे, पेडणे-गोवा) यालाही गावठी बंदूक पुरवली होती. पोलिसी कारवाईच्या भीतीने राजू पाटील स्वतः बंदुकीसह बांदा पोलीस ठाण्यात हजर झाला. न्यायालयाने या तिन्ही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बंदूक बनवणारा मुख्य सूत्रधार नारायण मेस्त्री सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात

या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि बेकायदेशीर गावठी बंदुका तयार करून देणारा नारायण मेस्त्री (रा. माजगाव, सावंतवाडी) याच्यावरही बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून, बांदा पोलीस त्याला लवकरच तपासासाठी ताब्यात घेणार आहेत. जप्त केलेली जिवंत काडतुसे नेमकी कुठून आणली आणि गोव्यासह स्थानिक परिसरात आणखी कोणाकोणाला बंदुका पुरविल्या, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम पालकर करत आहेत.

देवसू व दाणोली येथे पोलिसांची मध्यरात्री धाड: ४ बंदुका आणि खवले मांजर तस्करी उघड

दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे देवसू आणि दाणोली गावातील चार वेगवेगळ्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत विनापरवाना ४ बंदुका (३ ठासणीच्या व १ काडतुसाची), ३ जिवंत काडतुसे आणि १.१३५ किलो वजनाची खवले मांजराची १५४ लहान-मोठी खवले असा एकूण ७०,४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अशोक लक्ष्मण सावंत (६०, रा. दाणोली गावठाणवाडी), गजानन उर्फ अमोल अर्जुन सावंत (४२, रा. देवसू पलीकडचीवाडी), संतोष विठ्ठल जाधव (४२, रा. देवसू जाधववाडी) आणि सूरज धर्मेंद्र सावंत (२९, रा. देवसू मधलीवाडी) या चौघांना तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तपासात आणखी दोघांचा सहभाग निष्पन्न; गुरुवारी पहाटे दोन नवे संशयित अटकेत अटक करण्यात आलेल्या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता, या बेकायदेशीर व्यवहारात अन्य साथीदारांची नावे समोर आली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी पहाटे माजगाव व सरमळे परिसरात धाडी टाकून आणखी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही एक बिगरपरवाना बंदूक जप्त करण्यात आली आहे.

ही संपूर्ण धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, उपनिरीक्षक अविनाश पाटील, निलेश परब, महेश निरवडेकर आणि बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, संभाजी देसाई, ज्ञानेश्वर हळदे व सहकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या आंतरराज्यीय बेकायदेशीर शस्त्र व वन्यजीव तस्करी प्रकरणात आणखी काही मोठे चेहरे गजाआड होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news