Sindhudurg Crime : अवैध मांस तस्कराचा तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न

संशयित मांस फेकून फरार : आजगाव-धाकोरे परिसरातील घटना
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव-धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीच्या संशयावरून अंगावर काटा आणणारी घटना घडली. संशयित मांस वाहतूक करणाऱ्या एका इसमाने आपला पाठलाग करणाऱ्या विनायक झाटये या तरुणाच्या अंगावर थेट गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून विनायक झाटये थोडक्यात बचावले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित आरोपी या भागात सातत्याने संशयास्पद मांसाची वाहतूक करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली दिसताच विनायक झाटये यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने आपली भरधाव गाडी थेट विनायक यांच्या दिशेने घातली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांत फेकले गेल्याने विनायक यांचा जीव थोडक्यात बचावला. विनायक यांच्या भावानेही आपली गाडी आडवी लावून आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी बेदरकारपणे वाहन चालवत पसार झाला.

ग्रामस्थांचा संताप

आरोपीवर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज विनायक वाचला, पण उद्या कोणाचा जीव गेला असता तर? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या गुंडप्रवृत्तीच्या मांस तस्करावर कठोर कारवाई करण्याची मागणी आजगाव-धाकोरे परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news