Parashuram Uparkar| सिंधुदुर्गात मटका, जुगारासह अवैध धंदे रोखण्यात गृहखाते अपयशी

परशुराम उपरकर यांचा आरोप : ...अन्यथा ठाकरे शिवसेना छापे
Parashuram Uparkar
सिंधुदुर्गात मटका, जुगारासह अवैध धंदे रोखण्यात गृहखाते अपयशी
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्गात मटका, जुगारासह अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. अमली पदार्थांमुळे युवापिढी बरबाद होत असून अनेकांनी यामूळे आत्‍महत्‍या केल्या आहेत. पोलिसांच्या आशिर्वादाने हे धंदे सुरू असून ते रोखण्यात गृहखाते अपयशी ठरले आहे. मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सिंघम स्टाईलने मटका अड्डयावर धाड टाकली, परंतु ही कारवाई खरंच अवैध धंदे रोखण्यासाठी होती का? की अन्य कारणासाठी असा सवाल करत येत्या काही दिवसांत पोलिस यंत्रणेकडून या अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास ठाकरे शिवसेना अवैध धंद्यावर धाड टाकणार असल्याचा इशारा शिवसेना नेते, माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, पोलिस यंत्रणेकडून अमली पदार्थ आणि मटक्यावर आठवड्यातून एक दोन दिवस धाड टाकल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र अमली पदार्थाचे नेटवर्क वेगाने विस्तारत आहेत. अमली पदार्थामध्ये अडकलेल्या तरूणांवर अखेर आत्महत्येची वेळ येत आहे. वर्षाला सरसरी अशा दीडशे आत्महत्या जिल्ह्यात होत आहेत. सिंधुदुर्गात पट आणि जुगार देखील खुलेआम सुरू झाले आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किमी अंतरावर मोठा जुगार अड्डा चालतो. त्यासाठी दीड लाखापर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याखेरीज सिंधुदुर्गात माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सूली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड, कट्टा या ठिकाणी देखील खुलेआम जुगार सुरू आहे. हे जुगार अड्डे सुरू राहावेत यासाठी काही लोकांना मॅनेज केले जात आहे. असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

सिंधुदुर्गात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे. पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देखील मटका, जुगार रोखण्यात अपयशी ठरले आहेत. येत्या काही दिवसांत पोलिसांनी पूर्णतः अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेनाच अशा अवैध धंद्यांवर छापे टाकून ते बंद करणार आहे, असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news