

ओरोस : जिल्ह्यातील कणकवली येथे मटका बुकी अड्ड्यावर आपण धाड टाकल्यानंतर अवैध धंदे हळूहळू बंद होत आहेत. पोलिस दररोज अनेक कारवाया करत आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे करणार्या कुणालाही सोडणार नाही, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना दिला आहे. ओरोस येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन ते बोलत होते.
ते म्हणाले, अवैध धंद्यांविरोधात जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांच्याकडून दररोज अनेक कारवाया सुरू आहेत. या कारवाया अतिशय जोमाने केल्या जात आहेत. पोलिस चांगले काम करत आहेत. कधी नव्हे इतक्या कारवाया सुरू आहेत. आम्ही कोणालाही सोडणार नाही. अवैध धंदे करणार्यांना ‘चुन चुन के मारेंगे’ असाही इशारा नितेश राणे यांनी दिला.