Sindhudurg News : वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

कोचरा येथील जमिनीवर परस्पर नावे दाखल केल्याचा निषेध
Sindhudurg News
वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू
Published on: 
Updated on: 

वेंगुर्ला : कोचरा (ता. वेंगुर्ला) येथील श्री देव निरांकार देवस्थान इनाम जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मूळ वहिवाटदारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता परस्पर कुळांची नावे कब्जेदार सदरी दाखल केल्याच्या निषेधार्थ, कोचरा-भटवाडी येथील रहिवासी श्रीकृष्ण माधव टेंगशे यांनी वेंगुर्ला तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.

श्रीकृष्ण टेंगशे यांच्या कुटुंबाची कोचरा गावातील गट क्रमांक ६५/१, ६५/२ आणि ७४/१८ या देवस्थान इनाम जमिनीवर गेल्या सहा पिढ्यांपासून वहिवाट असून, या जमिनीत त्यांनी स्वकष्टाने फळबागायत फुलवली आहे. या जमिनीसंदर्भात सावंतवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात २०१८ पासून अपील प्रलंबित असतानाही, संबंधित महसूल यंत्रणेने (तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी) अपिलार्थींना पूर्णपणे अंधारात ठेवून आणि कोणतीही कायदेशीर सुनावणी न घेता सातबारा उताऱ्यावरील मूळ नावे कमी करून कुळांची नावे कब्जेदार सदरी नोंदवली असल्याचा गंभीर आरोप टेंगशे यांनी केला आहे.

​फेरफार नोंद करताना हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचा दिनांक आणि फेरफार नोंद केल्याचा दिनांक एकच असल्याचे निवेदनात नमूद केले आहे, जे कायदेशीर प्रक्रियेच्या विरोधात आहे. तसेच संबंधित सातबारा उताऱ्यावर मृदा संधारण खात्याचे कर्ज वसुलीचे बोजे असतानाही ते कमी न करता घाईघाईने जमिनीचे अभिलेख बदलण्यात आले आहेत. या जमिनीतील सुमारे १०० ते १२५ फळझाडांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले आहे; मात्र सातबारा बदलल्यामुळे वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई कोणाच्या खात्यात जमा होणार, असा पेच निर्माण झाला आहे.

उपोषणकर्ते श्रीकृष्ण टेंगशे हे गेल्या दोन वर्षांपासून लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराने त्रस्त असून गोव्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या फळबागायतीच्या उत्पन्नावरच त्यांचा उदरनिर्वाह आणि उपचाराचा खर्च चालतो. महसूल यंत्रणेच्या या कारभारामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, आपल्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला संबंधित महसूल यंत्रणा जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची व फौजदारी कारवाई करावी, तसेच बेकायदेशीररीत्या केलेले फेरफार रद्द करून अभिलेखांना तत्काळ स्थगिती द्यावी, या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरूच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.